हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड’ ही योजना (KCC Loan Scheme) सुरु करण्यात आली आहे. तुम्हालाही शेतीसाठी कर्ज उभे करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून तुम्हालाही दोन लाखांपर्यंतचे कर्ज हे केवळ दोन ते चार टक्के व्याजदराने उपलब्ध होऊ शकते. या योजनेबाबतची (KCC Loan Scheme) संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…
काय आहे योजना
देशातील शेतकऱ्यांना सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागू नये. तसेच देशातील शेतकरी सावकारी जाचात सापडू नये, यासाठी केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 2 लाखांपर्यतचे कर्ज हे केवळ 2 किंवा 4 टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होत असते. फेब्रुवारी 2020 पासून आतापर्यत जवळपास 4.5 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
व्याजदर किती टक्के? (KCC Loan Scheme For Farmers)
शेतकऱ्यांना या योजनेत केवळ दोन ते चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. इतक्या कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेद्वारे कर्ज दिले जात नाही. त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांना भांडवल उभारणीसाठी वरदान ठरली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जभरणा केल्यास शेतकऱ्यांना निर्धारित व्याजात देखील सूट दिली जाते. मात्र शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज न भरल्यास त्यांना व्याजात दिली जाणार सूट ही 9 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. या योजनेच्या माध्यमातून शेती व्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कमी व्याजदरात हे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते.
आवश्यक कागदपत्रे
- योजनेचा भरलेला अर्ज
- ओळखपत्र पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक.
- रहिवासाचा पुरावा. यात पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक देऊ शकतात.
- जमिनीची कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
कुठे कराल अर्ज?
किसान क्रेडिट कार्डद्वारे (KCC Loan Scheme) कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला एक करावा लागेल. हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या किसान क्रेडिट कार्ड केंद्र किंवा तुमच्या बँक शाखेला भेट द्यावी लागेल. याबाबतची संपूर्ण माहिती कोणत्याही बँकेच्या वेबसाइटवरून मिळू शकते. तुमच्या बँक किंवा किसान क्रेडिट कार्ड केंद्रातून तुम्हाला अर्ज भेटू शकतो. हा अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह तो बँकेत जमा करा.