Koyna Dam : कोयनेतून शेतीसाठी पाणी सोडले; 1050 क्यूसेसचा विसर्ग सुरु!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोयना धरणातून (Koyna Dam) तात्काळ दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून, सातारा, सांगली जिल्ह्याला पिण्याचा पाणीपुवठा करणे (Koyna Dam), जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे. याचे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. मंत्रालयात देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.24) कोयना धरणातील पाणीसाठा वापराबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी कोयना धरणातून 1050 क्यूसेस क्षमतेने दोन टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात आले आहे. हे पाणी सांगली जिल्ह्याला पोहोचण्यासाठी दीड ते दोन दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. एकूण जलाशयाच्या प्रमाणात यावर्षी जवळपास 25 टक्के पाणीसाठा कमी आहे. कोयना धरणातील (Koyna Dam) 67 टक्के पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात येते. मात्र या वर्षी जलसाठा कमी असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, शेतीसाठी पाणी देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

वीज निर्मितीत कपात (Koyna Dam 1050 Cusecs Water Release)

शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याद्वारे तुटीत येणारी किती वीज विकत घ्यावी लागेल? याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना या बैठकीत जलसंपदा विभागासह महानिर्मिती आणि महाजेनको या कंपन्यांना देण्यात आल्या आहे. यामध्ये दहा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा आणि पंधरा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा तयार करून किती वीज खरेदी करावी लागेल? याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या बैठकीला आमदार अनिल बाबर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत मयेकर, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगिरी, महावितरणचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, एमएलडीसीचे कार्यकारी संचालक शशांक जवळकर, कोयना धरणाचे मुख्य अभियंता चोपडे, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

error: Content is protected !!