हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Krishna Bhima Project) ऐन पावसाळ्यातील अतिरिक्त पुराचे पाणी दुष्काळी मराठवाड्याला दिले जाणार आहे. या पूर व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेने 4 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशातच आता दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला देखील चालना मिळणार आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी (Krishna Bhima Project) जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून, याबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली आहे.
शेतकऱ्यांना फायदा होणार (Krishna Bhima Project For Farmers)
जागतिक बँकेच्या मदतीने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प (Krishna Bhima Project) राबविला जाणार आहे. यात जोखीम गृहित धरुन जलव्यवस्थापन, पूर व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच त्यांनी या प्रकल्पबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे. यावेळी खासदार संजय पाटील, मुख्य सचिव नितीन करीर, मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, नाबार्ड अधिकारी तसेच विविध विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते.
15 हजार कोटीची कामे होणार
याशिवाय नाबार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, पहिल्या टप्प्यात 37 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4 हजार 643 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर सिंचनक्षमता वृद्धीसाठी 155 प्रकल्पांच्या कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 5 हजार 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर पहिल्या टप्प्यात ही सुमारे 10 हजार कोटींची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 38 अपूर्ण प्रकल्प पूर्णत्त्वास नेली जाणार आहेत. अशी एकूण 15 हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली आहे. या प्रकल्पांमुळे नियमित अर्थसंकल्पावर त्याचा भार पडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.