Land Purchase : जमीन खरेदी करताय? मग… या गोष्टींची काळजी घ्याच, नाहीतर होईल मनःस्ताप!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतजमिन खरेदी (Land Purchase) करताना काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण खरेदी खत करतेवेळी शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा वेळी शेतकऱ्यांनी संबंधित जमिनीचा सातबारा, फेरफार उतारा, भोगवटादार वर्ग, संबंधित जमिनीचा नकाशा, त्या जमिनीला शेत रस्ता आहे की नाही? या बाबी पडताळून पाहणे खूप महत्वाचे असते. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. विक्रीला काढलेली जमीन एका शेतकऱ्याच्या नावावर आणि तिचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे असू शकतो. ज्यामुळे खरेदी (Land Purchase) खत होऊनही सातबारा उताऱ्यावर नाव लागत नाही. कारण जमिनीचा मूळ मालक विरोधात गेल्याने तुम्हालाही मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

या गोष्टी काळजीपूर्वक पहा (Land Purchase Care Of These Things)

 1. संबंधित जमिनीचा सातबारा आणि फेरफार
  तुम्ही जी जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल. त्या जमिनीचा सातबारा उतारा संबधित तलाठ्याकडून काढा. त्या सातबारा उताऱ्यावरील फेरफार पहा. तसेच तलाठ्याकडून त्या क्षेत्राचा ८ अ उतारा देखील काढा. त्यावरील सर्व बाबी बघून मगच जमीन खरेदीचा विचार करा. कारण त्या जमिनीवर एखाद्या बँकेचे कर्ज असू शकते. त्या जमिनीबाबत न्यायालयात एखादा वाद सुरु असेल. तर अशी जमीन तुमच्या माथी मारली जाऊन तुम्हाला मनःस्ताप सहन करावा लागू शकतो. संबंधित जमिनीवर कोणतेही कर्ज नाही. किंवा कोणताही खटला सुरु नाही. अशा जमिनीचाच खरेदीसाठी विचार करा. संबंधित जमिनीवरून सरकारचा एखादा महामार्ग तर नियोजित नाही ना? ही देखील खात्री करून घ्या.
 2. भूधारणा पद्धत तपासून घेणे
  संबंधित जमिनीचा सातबारा पाहताना त्यावर ‘भोगवटादार वर्ग-1’ किंवा ‘भोगवटादार वर्ग-2’ यापैकी एक काहीतरी नमूद केलेले असेल. अशावेळी संबंधित जमिनीच्या उताऱ्यावर ‘भोगवटादार वर्ग-2’ असे लिहिलेले असेल तर अशी जमीन खरेदी करून नये. अशा जमिनीचे हस्तांतर करण्यावर सरकारचे निर्बंध आहेत. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर ‘भोगवटादार वर्ग-1’ असे लिहिलेले असेल तरच जमीन खरेदी करावी. ‘भोगवटादार वर्ग-1’ लिखित जमिनीच्या खरेदी-विक्रीवर सरकारचे कोणतेही निर्बंध नसतात. सातबारा उताऱ्यावर ‘भोगवटादार वर्ग-2’ असे नमूद केलेल्या जमीनी सरकारच्या परवानगीशिवाय विक्री होत नाही. अशा जमिनी देवस्थान, इनामी जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी असतात.
 3. संबंधित जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे
  तुम्हाला ज्या ठिकाणी जमीन खरेदी (Land Purchase) करायची आहे. अशा जमिनीचा नकाशा तलाठ्याकडून मिळवा. किंवा तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयातही तो तुम्हाला उपलब्ध होईल. नकाशा तपासून पाहिल्याने तुम्हाला तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनीच्या चतु:सीमा कळतात. कारण जमिनींचे क्षेत्र नकाशात एक आणि प्रत्यक्षात एक असे असू शकते. नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी करत असलेल्या जमिनीच्या आजूबाजूचे गट नंबर समजतील. ज्याद्वारे तुम्ही शेजारील शेतकऱ्यांकडे त्या जमिनीबाबत चौकशी करू शकतात.
 4. शेत रस्ता आहे की नाही?
  तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनीला शेतरस्ता आहे की नाही, ते पाहणे ही खूप महत्वाचे असते. अन्यथा खरेदीनंतर प्रत्यक्ष जमीन कसताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जमीन बिगर शेती असेल तर त्या जमिनीच्या रस्त्याची खूण नकाशात दाखवलेली असते. मात्र, शेत जमीन खरेदी करताना त्या जमिनीला असलेला रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.
 5. खरेदी खत
  सर्व माहिती काढल्यानंतरच खरेदी (Land Purchase) खत करण्याचे पाऊल टाकावे. त्यासाठी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे. यात गट नंबर, मूळ मालकाचे नाव, चतु:सीमा, क्षेत्र बरोबर आहे की नाही? ते तपासून घ्यावे.
error: Content is protected !!