हॅलो कृषी ऑनलाईन : जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची (Leopard) वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट्या प्रजनन नियंत्रित करावे. तसेच या चारही तालुक्यात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करावा. या मागणीला (Leopard) प्रतिसाद देत याबाबत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव आणि वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी दिले आहेत. अशी माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मानवी वस्त्यांत पाळीव जनावरे व शेतकऱ्यांवर बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांसह शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाही. बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावणे पुरेसे नाही. बिबट्यांचे प्रजनन नियंत्रण करण्याची गरज आहे, अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी अनेक दिवसांपासून लोकसभेत उपस्थित करत होते. या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी अलीकडेच केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव व वन विभागाचे महासंचालक गोयल यांची भेट घेतली. यावेळी हे निर्देश देण्यात आले आहेत.
आर्थिक मदत देण्याची मागणी (Leopard Attacks On Farmers)
याशिवाय विषारी सर्पदंशाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. साप चावणे आणि इतर विषारी प्राणी हे हल्ले बिबट्याच्या हल्ल्याइतकेच गंभीर झाले असून, विषारी सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या किंवा कायमचे अपंग झालेल्यांच्या कुटुंबीयांना बिबट्याच्या हल्ल्यांच्या निकषानुसार आर्थिक मदत देण्याची मागणी खासदार कोल्हे यांनी केली आहे. त्यामुळे आता साप चावण्याचे प्रमाण कमी करता येईल का? याबाबत चाचपणी करण्याच्या सूचनाही वनमंत्र्यांनी दिल्या आहेत.