Madhura Jwari : ज्वारीपासून गूळ, काकवीची निर्मिती; वाचा ‘मधुरा-1’ वाणाची वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाप्रमाणे ज्वारीची धाटे (Madhura Jwari) (ग्रामीण भाषेत ज्वारीचे ताट) चरकामध्ये घालून गोड रस काढत, गूळ, काकवी तयार करत असल्याचे तुम्ही कधी पहिले आहे का? नाही ना? मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण येथील निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) गेली 50 वर्षे या गोड धाटाच्या ज्वारीवर काम करत आहे. त्यातूनच संस्थेकडून नव्वदच्या दशकात ज्वारीची ‘मधुरा-1’ ही संकरित जात तयार करण्यात आली आहे. ज्वारीच्या या मधुरा-1 जातीपासून (Madhura Jwari) ‘मद्यार्क, काकवी व गूळ तयार करता येतो.

याशिवाय ‘मधुरा-1’ (Madhura Jwari) या जातीपासून चांगल्या प्रतीचे ज्वारीचे धान्य, जनावरांना पौष्टिक चारा, मूरघासही या जातीच्या ज्वारीपासून उत्पादित करता येतो. निंबकर कृषि संशोधन संस्थेने हे गोड ज्वारीच्या धाटापासून काकवी आणि गूळ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. दरम्यान, नव्वदच्या दशकानंतर संस्थेने हळूहळू काही बदल करत ज्वारीच्या मधुरा-2 व मधुरा-3 हे नवीन दोन ज्वारीचे वाण देखील विकसित केले आहेत.

‘मधुरा 1’ ज्वारीचे गुणधर्म (Madhura Jwari Production Of Jaggery, Kakvi)

  • ‘मधुरा-1’ वाणाची ज्वारी सरासरी 120 दिवसांत काढणीला येते.
  • मधुरा-2 व मधुरा-3 या जाती अनुक्रमे 118 व 114 इतक्या दिवसांत काढणीला येते.
  • ‘मधुरा-1’ या जातीची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामांमध्ये लागवड करता येते.
  • खरीप व उन्हाळी हंगामात या जातीच्या ज्वारीपासून धाटांचे अधिक उत्पादन मिळते. तर रब्बी हंगामात अधिक धान्य उत्पादन या जातीपासून मिळवता येते.
  • हा जातीच्या धाटांपासून तुम्ही काकवी तयार करू शकतात.
  • काकवी तयार करणे शक्य नसल्यास या जातीचा चारा हा दुधाळ जनावरांसाठी खूप पौष्टिक मानला जातो. या जातीच्या ज्वारीच्या चाऱ्यामुळे दूध उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होते.
  • या जातीच्या ज्वारीच्या काकवीमध्ये कॅल्शियम, प्रथिने, क जीवनसत्व आणि निकोटिनिक आम्ल (बी-3 जीवनसत्व) अधिक प्रमाणात असतात.
  • हल्ली मध हे बाजारात महागडे असते. मात्र, या ज्वारीच्या धाटापासून तयार केलेली ही काकवी मधाला उत्तम पर्याय ठरते.
  • एका हेक्टर क्षेत्रात ‘मधुरा-1’ या ज्वारीची पेरणी केल्यास, त्यापासून मिळणाऱ्या ज्वारीच्या धाटापासून एका हंगामात हेक्टरी 1000 ते 1200 लीटर मद्यार्काचे उत्पादन मिळवता येते.

अमेरिकेतील जॉर्जिया या भागात आपल्याकडे ज्या पद्धतीने रस्त्यांवर उसाच्या रसाचे गाडे लावले जातात. अगदी त्याच पद्धतीने ज्वारीचे धाटे चरकामध्ये घालून रस काढला जातो. आपल्याकडील उसाच्या गुऱ्हाळासारखे, तिकडे त्या भागात ज्वारीचे गुऱ्हाळ देखील पाहायला मिळतात. याशिवाय उसाच्या सिरप म्हणजे काकवीप्रमाणे तिकडे ज्वारीची काकवी काढली जाते, असे फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेने याबाबत म्हटले आहे.

error: Content is protected !!