पाथरी तालुक्यात दोन महिन्यात सरासरीच्या 76.09 टक्केच पाऊस; 85 टक्के क्षेत्रावर झाल्या पेरण्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharastra Rain Update : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या चार महसूल मंडळामध्ये यंदा असमान स्वरूपाचा पाऊस झाला आहे . अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रस्तावित क्षेत्राच्या ८५ .७९ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत .यावेळी तालुक्यातील काही गावांमध्ये दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे .

यंदा मोसमी पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहे .पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळामध्ये पावसाची मोठी विषमता आहे .खरिपातील पेरण्यावरही पावसाचा परिणाम झाला आहे .खरिपातील मूग, उडीद व तीळ पिकांचा पेरणी कालावधी निघून गेल्याने शेतकऱ्यांना साठ दिवसाच्या कालावधीमध्ये उत्पन्न देत आर्थिक आधार देणारा खरीपातील हा पीक पेरा अत्यंत कमी झाला आहे .त्यामुळे येणाऱ्या सणावारांच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक चंचणीचा सामना करावा लागणार आहे .

तालुक्यात उसाचे क्षेत्र वगळता यंदा खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र ४४ हजार ९५० हेक्टर एवढे आहे. तालुका कृषी विभागाच्या २५ जुलै पर्यंत आलेल्या अहवालानुसार प्रस्तावित क्षेत्राच्या ३८ हजार ५६३ हेक्टर क्षेत्रावर तालुक्यातील चारही महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली आहे. तालुक्यात जून पासून जुलैपर्यंत ३४० मिमी एवढा सरासरीचा पाऊस पडत असतो. परंतु यावर्षी आतापर्यंत २६१.३ मिमी म्हणजे सरासरी पडणाऱ्या पावसाच्या ७६ .९टक्के एवढा कमी पाऊस झाला आहे .

पावसाची मंडळनिहाय आकडेवारी पाहिली असता पाथरी महसूल मंडळामध्ये सर्वाधिक ३१२ .६ मिमी, बाभळगाव महसुल मंडळात २८४.७मिमी , सर्वात कमी पाऊस हादगाव महसुल मंडळात मध्ये १९९ .८ मिमी तर कासापुरी महसुल मंडळात २४५.५ मिमी पाऊस पडला आहे. पाथरी महसुल मंडळ वगळता इतर तीन महसुल मंडळामध्ये जून जुलै या दोन महिन्यामध्ये पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत कमी पाऊस नोंदवला गेला आहे. जुन जुलै महिन्यात तालुक्यातील चारही महसुल मंडळात अनुक्रमे ९१ .९ टक्के , ८३ .७,टक्के ,५८.८ टक्के , ७२.२ टक्के पाऊस पडला आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाने खरीप पिके जोमात होती. पावसाने तालुक्यातील तीन उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढल्याने पाण्याचा अनेकवेळा विसर्ग करावा लागला होता . जुलै नंतर मात्र पावसाने मोठा खंड दिला होता परंतु जमिनीत पुरेशी ओल असल्याने खरीप पिके तग धरून राहिली होती .यंदा कमी प्रमाणात पडत असलेला पाऊस त्यामुळे जमिनीतील ओलावाही कमी आहे .पावसाने खंड दिल्यास जिरायती क्षेत्रा मधील खरीप पिकांचे कसे होणार ?असा प्रश्न शेतकऱ्यांकडे उभा आहे .तालुक्यातील दक्षिण भागातील अनेक गावांमध्ये अद्यापही मोठा पाऊस झाला नाही .दुबार पेरणी करावी लागल्याने या भागातील शेतकरी आर्थिक संकटात आहे .उशिरा पेरण्यात आलेली खरीप पिके येतील की नाही ? असा त्यांना प्रश्न पडलेला असताना मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत हे शेतकरी आहेत .

दरम्यान, तालुका कृषी विभागाच्या २५ जुलै पर्यंत आलेल्या अहवालानुसार प्रस्तावित क्षेत्राच्या ३८ हजार ५६३हेक्टर क्षेत्रावर तालुक्यातील चारही महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली आहे. यामध्ये खरीप ज्वारी ९ हेक्टर ,बाजरी ५७ हेक्टर , मक्का ७५ हेक्टर ,तुर ३ हजार २३४ हेक्टर , मुग ७९५ हेक्टर , उडीद १७४हेक्टर ,तीळ २ हेक्टर , सोयाबीन १६ हजार २७६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर कापूस १७ हजार ९४० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला आहे .

error: Content is protected !!