Mahindra CNG Tractor : महिंद्राने आणलाय सीएनजी ट्रॅक्टर; इंधन खर्चात होणार बचत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्सने सीएनजीवर (Mahindra CNG Tractor) चालणाऱ्या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. आतापर्यंत बहुतेक सर्व कंपन्यांचे ट्रॅक्टर हे डिझेलवर चालत होते. मात्र, आता सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे (Mahindra CNG Tractor) शेतकऱ्यांच्या मशागत खर्चात मोठी बचत होणार आहे. कारण डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत या सीएनजी ट्रॅक्टरला इंधनासाठी कमी खर्च येत असल्याचे महिंद्रा कंपनीचे म्हणणे आहे.

महिंद्रा कंपनीने नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन-2023’ या कृषी प्रदर्शनात केंद्रीय दळणवळण व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या आपल्या पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरचे अनावरण केले आहे. या ट्रॅक्टरची निर्मिती (Mahindra CNG Tractor) कंपनीकडून चेन्नई येथे करण्यात आली असून, तो डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या बरोबरीने ताकद आणि काम करण्याची करण्याची क्षमता ठेवतो. कंपनीने या ट्रॅक्टरला गॅस भरणा करण्यासाठी 45 लिटरच्या चार टाक्या दिल्या आहेत. या टाक्यांमध्ये 200 बार दाबासह 24 किलो गॅस भरण्याची क्षमता कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत या ट्रॅक्टरला प्रति तास 100 रुपये कमी इंधन खर्च लागणार आहे. असा दावा कंपनीकडून केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती मशागतीसाठीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रदूषणास आळा बसणार (Mahindra CNG Tractor For Agriculture Sector)

महिंद्राचा हा सीएनजी ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत 70 टक्क्यांहून कमी प्रदूषणकारी आहे. यासोबतच इंजिनचा आवाज (इंजिन कॉम्प्रेशन) 3.5 डेसिबलने कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ध्वनी आणि वायू या दोन्हींच्या प्रदूषणास आळा बसणार आहे. तसेच कंपनीने या ट्रॅक्टरचे इंजिन हे अधिक टिकाऊ बनवले असून, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या बदलांमुळे मोठ्या कालावधीपर्यंत काम करणे शक्य होणार आहे. इतकेच नाही तर शेती आणि शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायातील वापरासाठी चालकाच्या दृष्टीने हा सीएनजी ट्रॅक्टर अधिक आरामदायी बनवण्यात आला आहे.

कधी होणार लॉन्च?

सीएनजी तंत्रज्ञानावर आधारित हा ट्रॅक्टर सध्या उपलब्ध असणाऱ्या ट्रॅक्टरांप्रमाणेच शेतीची सर्व प्रकारची कामे कुशलतेने करू शकतो. महिंद्रा कंपनीने या ट्रॅक्टरला बाजारात आणण्यासाठी तयारी सुरु केली असून, सीएनजी तंत्रज्ञानावर येणाऱ्या सर्व स्तरातील प्रतिक्रियांच्या मूल्यांकनानंतर कंपनीकडून हा सीएनजी ट्रॅक्टर लॉन्च केला जाणार आहे. या ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी प्रदूषण नियंत्रण, ताकद आणि काम करण्याच्या क्षमतेवर विशेष भर दिला असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे.

error: Content is protected !!