हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) आपल्या जानेवारी महिन्यातील विक्रीची आकडेवारी जारी केली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 या महिन्यात महिंद्रा ट्रॅक्टरच्या देशातंर्गत विक्रीत 17 टक्के, निर्यात विक्रीत 25 टक्के तर एकूण विक्रीत जवळपास 17 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून एकूणच संपूर्ण ट्रॅक्टर उद्योगाला विक्रीमध्ये मोठा फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील डिसेंबर महिन्यातही महिंद्रा कंपनीला (Mahindra Tractors) आपल्या एकूण ट्रॅक्टर विक्रीत 18 टक्क्यांनी घट सहन करावी लागली होती.
निर्यात विक्रीत 25 टक्क्यांनी घट (Mahindra Tractors Sales Down 17 Percent)
महिंद्रा कंपनीच्या (Mahindra Tractors) जानेवारी महिन्यातील विक्री आकडेवारीनुसार, कंपनीने जानेवारी 2024 या महिन्यात देशातंर्गत बाजारात आपल्या 22,972 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षी याच महिन्यात 27,626 इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी महिंद्रा कंपनीचे जानेवारी महिन्यात 4,654 ट्रॅक्टर कमी विक्री झाले असून, ही घट मागील जानेवारी 2023 च्या तुलनेत 17 टक्के इतकी आहे. तर महिंद्रा कंपनीला मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत ट्रॅक्टर निर्यात करण्यातही काहीसे अपयश आले आहे. कंपनीने जानेवारी 2024 या महिन्यात एकूण 976 ट्रॅक्टरची निर्यात केली असून, जी मागील वर्षी याच कालावधीत 1300 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली होती. अर्थात मागील महिन्यात कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीत 25 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे.
एकूण विक्रीत 17 टक्क्यांनी घट
कंपनीच्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये कंपनीने एकूण देशातंर्गत आणि निर्यात विक्रीद्वारे 23,948 ट्रॅक्टर विक्री केले आहेत. मागील वर्षीच्या जानेवारी 2023 या महिन्यात कंपनीला एकूण 28,926 ट्रॅक्टर विक्री करण्यात यश मिळाले होते. अर्थात यावर्षी जानेवारी महिन्यात महिंद्रा कंपनीच्या एकूण विक्रीत 4,978 ट्रॅक्टरची घट नोंदवली गेली आहे. जी टक्केवारीमध्ये 17 टक्के इतकी आहे.
दरम्यान, महिंद्रा कंपनीचे शेती अवजारे विभागाचे प्रमुख हेमंत सिक्का यांच्या म्हणण्यानुसार, “यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे जानेवारी महिन्यात कृषी क्षेत्रातील व्यापार घडामोडी काहीशा ठप्प असून, त्याचा ट्रॅक्टर विक्रीस फटका बसला आहे. मात्र येत्या दोन महिन्यांमध्ये गहू आणि फळबाग पिकांचे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा पिकांचे उत्पन्न हाती येताच शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे वाढू शकतो, अशी कंपनीला अपेक्षा आहे.”