Maize Rate : मकाच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ; मागणीतील वाढीचा परिणाम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत बाजारात मकाची मागणी वाढली असल्याने, मका दरात (Maize Rate) सुधारणा पाहायला मिळत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत देशभरातील बाजार समित्यांमध्ये मकाचे दर जवळपास 20 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मकाला 1,850 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. त्या तुलनेत सध्या मकाचे दर हे कमाल 2,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. त्यातच आता येत्या काळात मका दर (Maize Rate) तेजीतच राहणार असल्याचे बोलले जात आहे.

मागणीत वाढ (Maize Rate 20 Percent Increase)

केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले आहेत. परिणामी इथेनॉल निर्मिती उद्योगाचा ओढा मकापासून इथेनॉल निर्मितीकडे वाढला आहे. देशातील पोल्ट्री उद्योगासाठीच्या खाद्यासाठी देखील मकाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे देशातंर्गत बाजारात मकाचा वापर वाढला असून, वाढलेल्या मागणीमुळे दरात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने मका या पिकाला 2023-24 या वर्षासाठी 2,090 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निर्धारित केला आहे. मात्र देशासह महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये सध्या मका दरात कमालीची सुधारणा पाहायला मिळत आहे.

राज्यातील सध्याचे दर

सध्या राज्यातील अनके बाजार समित्यांमध्ये मकाला कमाल 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल दर (Maize Rate) मिळत आहे. खरिपातील मकाचा हंगाम संपला असून, रब्बी हंगामातही मकाचा पेरा हा पाण्याअभावी म्हणावा तसा झालेला नाही. खरिपाचे मका उत्पादन या यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहिले आहे. परिणामी, मकाचा तुटवडा भासणार आहे. त्यातच पोल्ट्री, इथेनॉल या दोन्ही उद्योगांमधून मकाला मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या तेजीत असलेले मकाचे दर आगामी काळात आणखी वाढलेले पाहायला मिळू शकतात.

व्यापाऱ्यांच्या साठ्यावर भर

मका व्यापारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, यावर्षीच्या हंगामात मका उत्पादन जवळपास 25-27 टक्क्यांनी कमी नोंदवले गेले आहे. त्यातच पोल्ट्री उद्योगाला सध्या पशु खाद्याचा तुटवडा जाणवत आहे. काही काही दिवसांपूर्वी पोल्ट्री उद्योगाला पुरवल्या जाणाऱ्या मकाला प्रति टन 21,000 ते 22,000 रुपये दर मिळत होता. जो सध्या 24,000 ते 25,000 प्रति टनांपर्यत पोहचला आहे. त्यातच इथेनॉल उद्योगाचाही मकासाठी ओढा वाढल्याने भविष्यात दर वाढीच्या अपेक्षेने व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात मका खरेदी करत साठा करून ठेवला जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योग, इथेनॉल उद्योग आणि व्यापारी अशी तीनही बाजूने मागणी वाढल्याने दरात वाढ पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!