Sucking Pest on Vegetable Crops: भाजीपाला पिकांवरील रसशोषक किडीचे असे करा नियंत्रण  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: रसशोषक किडी या (Sucking Pest on Vegetable Crops) भाजीपाला पिकांवरील सर्वात हानिकारक किडी आहेत. यांचा प्रादुर्भाव जवळपास सर्वच पिकांवर होतो. भाजीपाला पिकांवर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडी आणि लाल कोळी या रसशोषक किडी आढळतात  या किडी पानातून अन्नरस शोषतात, परिणामी पाने निस्तेज होतात. पांढुरके व नंतर तपकिरी डाग दिसू लागतात. किडीच्या (Sucking Pest on Vegetable Crops) शरीरातून स्त्रवणाऱ्या चिकट पदार्थांमुळे पानावर काळी बुरशी चढते.

एवढेच नाही तर या किडी व्हायरस सुद्धा पसरवतात. मिरची आणि टोमॅटो या पिकावरील लीफ कर्ल (बोकड्या), भेंडीवरील येलो व्हेन मोझॅक (हळद्या) या रोगाचा प्रसार रसशोषक किडी मार्फत होतो. कांदा पिकावर फुलकिडीमुळे करपा रोगाचा प्रसार होतो.  याचा परिणाम उत्पादनावर होऊन 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आर्थिक नुकसान होऊ शकते. आजच्या लेखात या किडींचे एकात्मिक नियंत्रण (Sucking Pest on Vegetable Crops) कसे करावे हे जाणून घेणार आहोत.

  1. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडी

प्रतिबंधात्मक उपाय (Preventive Measures to Control Sucking Pests)

  • पिवळे आणि निळे चिकट सापळे प्रति एकरी 10 लावावेत. मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासाठी पिवळे सापळे तर फुलकिडीसाठी निळे चिकट सापळे वापरावेत.
  • रसशोषक किडींना प्रतिबंध म्हणून सुरुवातीच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन (300 पीपीएम) 5 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • नत्रयुक्त खतांचा कमीत कमी वापर करावा.
  • टोमॅटो शेताच्या बांधावर ज्वारीचे पीक घेतल्याने रसशोषक किडींवर नियंत्रण मिळवता येते.
  • शेतातील तणे रसशोषक किडींना आश्रय देतात त्यामुळे वेळोवेळी तण नियंत्रण करावे

जैविक नियंत्रण उपाय (Biological Control)

  • लेडी बर्ड बीटल (ढाल किडे) किंवा ग्रीन लेस वींग/ क्रायसोपा (हिरवा जाळीदार पतंग), सिरफीड माशी या मित्र किडींचा वापर करावा.
  • एनकार्शिया हा परोपजीवी कीटक पांढरी माशी, मावा या किडींचे नियंत्रण करते
  • जैविक कीटकनाशके – वर्टिसिलियम लेकानी किंवा ब्यूवेरिया बैसियाना किंवा मेटाऱ्हायझियम अॅनिसोप्ली @ 50 मिली प्रति 15 लिटर पंप फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण उपाय (Chemical Control Measures)

इमिडाक्लोप्रीड 4 मिली किंवा डाइमेथोएट 30% ईसी 10 मिली, किंवा मिथाईल डेमेटॉन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

  •  लाल कोळी

ही कीड पानांतील रस शोषते, त्यामुळे पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते, पाने पिवळी पडतात, फळाची साल खडबडीत व अनैसर्गिक तपकिरी रंगाची दिसते. जास्त प्रादुर्भावग्रस्त पानातील हरितद्रव्ये 70 टक्क्यांपर्यंत कमी होतात, पाने तपकिरी होऊन वाळतात. जास्त संसर्ग होतो तेव्हा झाडांमध्ये जाळी दिसते.

प्रतिबंधात्मक उपाय

  • लाल कोळी लपण्याची ठिकाणे नष्ट करण्यासाठी शेत स्वच्छ आणि कचरा मुक्त करावे, पीक तण विरहित ठेवावे
  • नत्रयुक्त खताचा कमी वापर करावा
  • गोमूत्र पाण्यात मिसळून (1:20 प्रमाण) रोपांवर फवारणी करावी
  • निंबोळी अर्क 4 टक्के/10 लिटर पाणी किंवा निंबोळी तेल अर्क 1-2 मिली/लिटर पाणी दर 15 दिवसांनी फवारणी करावी       

जैविक नियंत्रण उपाय

  • ग्रीन लेस वींग/ क्रायसोपा –  2000 अंडी/एकर किंवा 4000 अळ्या/एकर
  • मित्र कीटक – लेडी बग बीटल, 
  • परभक्षी कोळी – एम्बलीसियस
  • जैविक कीटकनाशक – व्हर्टीसिलीयम लेकॅनी @ 5 ग्रॅम/लिटर पाणी किंवा 0.8 ते 1 किलो/एकर

रासायनिक  नियंत्रण उपाय

  • गंधक भुकटी @ 8 किलो/एकर धुरळणी करावी
  • गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मिली/10 लिटर पाण्यातून फवारणी
  • स्पायरोमेसिफेन 0.3 मिली किंवा अबॅमेक्टिन 0.7 मिली /लिटर पाणी फवारणी

लाल कोळी कीड तिच्या वसाहतीभोवती जाळे तयार करते, त्यामुळे एकरी 400 ते 500 लिटर कीडनाशकाचे द्रावण फवारूनही किडीपर्यंत ते पोचत नाही व प्रभावी नियंत्रण मिळत नाही. त्यासाठी हे जाळे तुटणे गरजेचे असते. एकरी एक हजार ते दोन हजार लिटर पाणी जोरदार प्रेशरने फवारले तर वसाहती भोवतालचे जाळे फाटते. काही प्रमाणात अंडी पाण्याने धुवून जमिनीवर पडतात व किडीची संख्या कमी होते. पाणी फवारणी प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी लाल कोळी नियंत्रकाची फवारणी केल्यास कमीत कमी फवारण्यांमध्ये किडीचे यशस्वी नियंत्रण (Sucking Pest on Vegetable Crops) होण्यास मदत होते.

error: Content is protected !!