Mango Export : महाराष्ट्रातून अमेरिका, युरोपला 5000 टन आंबा निर्यात होणार; पणन मंडळाची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात आंबा उत्पादक (Mango Export) शेतकऱ्यांना वातावरणाने चांगलीच साथ दिली आहे. परिणामी, देशात यंदा आंबा (Mango) उत्पादन 14 टक्क्यांनी अधिक राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील हापूस (Hapus) आणि केसर आंब्याचे (Kesar Mango) योगदान अधिक आहे. अशातच आता महाराष्ट्रातून यंदाच्या हंगामात एकूण 5 हजार टन आंबा विदेशात निर्यात (Mango Export) करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. असे महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळाने (MSAMB) एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तसमूहाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

अमेरिका, युरोपात निर्यात (Mango Export From Maharashtra)

महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळाने (MSAMB) म्हटले आहे की, गेल्या वर्षीचा हंगाम आंबा उत्पादक (Mango Export) शेतकऱ्यांसाठी काहीसा निराशाजनक राहिला होता. मात्र, यंदा आंबा उत्पादन चांगले झाले आहे. ज्यामुळे मंडळाकडून चालू वर्षीच्या हंगामात 5,000 टन आंबा राज्यातून योग्य प्रक्रिया करून निर्यात केला जाणार आहे. हा आंबा प्रामुख्याने अमेरिका आणि युरोप या विकसित राष्ट्रांमध्ये निर्यात केला जाणार आहे. राज्यातून हापूस आणि केसर आंबा निर्यात केला जाणार असून, अमेरिकेतील निर्यात निरीक्षक भारतात आल्यानंतर लवकरच ही निर्यात सुरु केली जाणार आहे. असेही पणन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वाशी निर्यात केंद्रात चाचणी होणार

दरम्यान, यावर्षीच्या हंगाम चांगला सुरु झाला असून, यंदा अनुकूल हवामानामुळे आंबा पीक जोमात आले आहे. प्रामुख्याने राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन, राज्य कृषी पणन महामंडळाकडून वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रामध्ये आंबा निर्यातीसाठीच्या सर्व बाबींची पूर्तता केली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम आंब्याची चाचणी केल्यानंतरच तो पुढे पाठवला जाणार आहे. असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

21.79 दशलक्ष टन उत्पादनाची शक्यता

भारतीय आंबा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्याच्या कोकण भागातून दरवर्षी हापूस आणि मराठवाड्यातील केसर आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. यामध्ये प्रामुख्याने आखाती देशांना सर्वाधिक निर्यात केली जाते. देशभरात जवळपास 2.4 लाख हेक्टरवर आंबा लागवड केली जाते. तर चालू हंगामात देशात एकूण 21.79 दशलक्ष टन आंबा उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीच्या हंगामात देशातून एकूण 22,963 टन आंबा निर्यात करण्यात आली होती.

error: Content is protected !!