Mango Leaf : दोन फूट लांब आंब्याचे पान; सिंधुदुर्गातील शेतकरी जगात भारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या आंबा पीक (Mango Leaf) मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आंबा उत्पादनात कोकणातील शेतकरी नेहमीच अग्रेसर असतात. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आंबा उत्पादक शेतकऱ्यांने एक नवीन विक्रम आपल्या नावे केला असून, त्याची नोंद मानाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. हा शेतकरी घेत असलेल्या आंबा पिकाचे पान (Mango Leaf) हे जगात सर्वात मोठे असल्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंद झाला आहे.

दोन फूट लांब, अर्धा फूट रुंद (Mango Leaf Two Feet Long)

चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर असे या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव असून, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विठ्ठलवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्या शेतातील हापूस आंब्याच्या बागेतील झाडाच्या पानाची लांबी (Mango Leaf) ही सुमारे 55.6 सेमी तर रुंदी 15.6 सें.मी इतकी आहे. जी जगात इतर कुठेही आढळून येत नाही. निसर्गात अशा बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात. पण त्या प्रकाशात आणणे महत्त्वाचे असते. याबाबत शेतकरी काजरेकर यांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून, सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

निवृत्तीनंतर बागेची जोपासना

चंद्रकांत काजरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 32 वर्षे सेवा बजावली आहे. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपली आंबा व काजू बागेची आवड जोपासली आहे. अशातच उत्पादन घेत असताना त्यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान हे खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. त्यामुळे त्यांनी काही नातेवाईकांच्या मदतीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी आपल्या आंबा पानाचा रिपोर्ट पाठविला.

सिंधुदुर्गचे नाव जगाच्या नकाशावर

या रिपोर्टच्या पडताळणीनंतर जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि भारत या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदले गेले आहे. इतकेच नाही तर शेतकरी काजरेकर यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग केले असून, त्यांनी आपल्या घरच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर शेकडो सुपाऱ्या व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग देखील केला आहे.

error: Content is protected !!