Mango Rate : मुंबईसह पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल; पहा ‘किती’ मिळालाय दर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2024 या नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुंबई व पुण्याच्या बाजार समित्यांमध्ये फळांचा राजा आंबा (Mango Rate) दिमाखात दाखल झाला आहे. रत्नागिरीचे शेतकरी डॉ. सुनील सुर्वे व पुष्कर सुर्वे यांच्या पावस येथील बागेतून नवी मुंबई बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली आहे. तर तिकडे पुण्यातही गुलटेकडी मार्केट यार्डात मानाच्या पहिल्या आंब्याची पहिली पेटी काल (ता. 18) दाखल झाली आहे. यावर्षी आंबा उत्पादकांना (Mango Rate) चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी सुर्वे यांनी म्हटले आहे.

किती मिळालाय दर? (Mango Rate Mumbai Pune Market)

रत्नागिरीतून नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या आज दाखल झाल्या आहेत. या पहिल्या आंब्याच्या पेट्यांची विधिवत पूजा करण्यात आली असून, यातील आंब्याच्या दोन डझनाच्या एका पेटीला सध्या 10 ते 15 हजार रुपयांचा दर (Mango Rate) मिळाला आहे. बाजार समितीने आंबा उत्पादकांना पहिल्या पेटीसाठी चांगला दर दिला असल्याचे शेतकरी सुर्वे यांनी म्हटले आहे. गेल्या 65 वर्षांपासून सुर्वे कुटुंबीय हापूस आंब्याचे उत्पादन घेत आहेत. तर तिकडे पुण्यातही चार डझन आंब्याची पहिली पेटी लिलावात 21 हजार रुपयात विकली गेली आहे. अर्थात मुंबई व पुण्यातील आंबा दरांची आकडेवारी पाहता, प्रत्येक आंबा हा 400 ते 600 रुपयांच्या दरम्यान विकला गेला आहे.

महिनाभरात आवक वाढेल

पुणे बाजार समितीत सर्वाधिक लिलाव बोली लावत बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने पुण्यातील ही मानाची पहिली आंबा पेटी विकत घेतली आहे. तर नवी मुंबई बाजार समितीत व्यापारी अमोल शिंदे यांनी आंब्याची पहिली पेटी खरेदी केली. यंदा कोकणात आंब्याचे मुबलक उत्पादन पाहायला मिळत असून, लवकरच आंब्याची आवक वाढणार असल्याचे व्यापारी अमोल शिंदे यांनी म्हटले आहे. सध्या आंबा हा महाग मिळत असला तरी भविष्यात सर्वांनाच मुबलक दरात उपलब्ध होऊ शकतो. अजून एक महिन्यानंतर आंब्याचे उत्पादन आणखी वाढेल. त्यावेळी सर्वसामान्यांना देखील रसाळ आणि फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची चव चाखायला मिळू शकेल, असे व्यापारी अमोल शिंदे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!