Marigold Export : भारतीय झेंडूचा सुंगध आखाती देशांत दरवळणार; पहिला कंटेनर रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ताजी फळे आणि भाजीपाल्यानंतर आता भारतीय झेंडूचा (Marigold Export ) सुंगध आखाती देशांमध्ये दरवळणार आहे. पूर्व उत्तरप्रदेशातून 400 किलो झेंडू वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Marigold Export) संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशात पाठवण्यात आला आहे. कृषी आणि अन्नप्रक्रियाकृत उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (एपीडा) अध्यक्ष अभिषेक देव यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे या झेंडूच्या पहिल्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. ही फुले हवाई मार्गे वाराणसी विमानतळावरून यूएईला पाठवण्यात आली आहे.

यावेळी अभिषेक देव म्हणाले, “देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी एपीडा नेहमीच कटिबद्ध असून, यासाठी कृषी निर्यात साखळीत देशातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना सामावून घेतले जात आहे. त्याद्वारे देशातील कृषी मालाच्या निर्यात वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पूर्व उत्तरप्रदेशात उत्पादित झालेला हा झेंडू आखाती देशात निर्यात करण्यात आला आहे. त्यामुळे आता फळे आणि भाजीपाल्यासह देशातील फुलांच्या निर्यातीस प्रोत्साहन मिळणार असून, देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.”

६० रुपये प्रति किलोने निर्यात (Marigold Export From India)

“वाराणसीस्थित मे.मधुजनसा फेड फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन लि. या शेतकरी उत्पादक संघटनेच्या माध्यमातून हा झेंडूचा पहिला कंटेनर युएईला पाठवण्यात आला असून, एपीडाने या शेतकरी उत्पादक कंपनीला विदेशी निर्यातदारांसोबत करार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक बाजारात झेंडूच्या फुलांना ४० रुपये प्रति किलो दर मिळत असताना, या शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत ही फुले ६० रुपये प्रति किलो दराने निर्यात करण्यात आली आहे.” असे एपीडाचे प्रादेशिक (उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार) प्रभारी उपमहाव्यवस्थापक डॉ.सी.बी सिंग यांनी यावेळी म्हटले आहे.

“वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने, एपीडाने उत्तर प्रदेशातून कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातून आखाती देशांसह युरोपमध्ये फळे आणि भाजीपाला निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.” असेही डॉ.सी.बी सिंग यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान मागील आठवड्यात एपीडाच्या माध्यमातून बारामतीहून शेतकरी उत्पादक कंपनीची केळी नेदरलँडला निर्यात करण्यात आली होती.

error: Content is protected !!