Mhaisal Irrigation Scheme : रब्बी हंगामासाठी म्हैसाळचा पंप सुरु; ‘या’ भागांना मिळणार पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामासाठी म्हैसाळ सिंचन योजनेअंतर्गत (Mhaisal Irrigation Scheme) ‘रब्बी आवर्तनाचा म्हैसाळ प्रकल्पाचा पंप गृह क्र.1’ सुरु करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हा (Mhaisal Irrigation Scheme) शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे व अन्य उपस्थित होते.

म्हैसाळ योजनेअंतर्गत योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये (सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील 5 आणि सोलापूर जिल्ह्यातील 2 तालुक्यांसह एकूण 7 तालुक्यांना) पुच्छ भाग ते शीर्ष भाग (छापा-काटा) धोरणानुसार पाणी सोडण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने 10 डिसेंबरपर्यंत केवळ जत कालव्याच्या लाभक्षेत्राला (जत, सांगोला, मंगळवेढा) भागाला पाणी देण्यात येणार असून, त्यानंतर 10 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीपर्यंत लाभ क्षेत्रातील विविध कालव्यांना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

काय आहे म्हैसाळ सिंचन योजना (Mhaisal Irrigation Scheme)

महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवर असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णा नदीकाठी हा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला आहे. म्हैसाळ येथून कृष्णा नदीतून पाणी उचलून सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील 5 आणि सोलापूर जिल्ह्यातील 2 तालुक्यांसह एकूण 7 दुष्काळी तालुक्यांना देण्यात येते. त्यामुळे १९८६ साली सुरु झालेल्या या योजनेचे नाव ‘म्हैसाळ सिंचन योजना’ पडले आहे.

यावर्षी संभाव्य पाणी टंचाईसदृष्य परिस्थिती लक्षात घेता, कोयना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातील वीजनिर्मितीच्या 35 टीएमसीपैकी 12 टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे. तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण कायद्यामधील तरतुदीनुसार नदीखोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपाच्या तरतुदीनुसार सांगली व सोलापूर जिल्ह्याला वेळेत समन्यायी पाणीवाटप व्हावे. योजनेतून वगळलेल्या तालुक्यांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यासाठी तोडगा काढावा, या ठरावांसह याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी 29 ऑक्टोबर 2023 रोजी सांगली येथील जिल्हा नियोजन सभागृहात कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे पंप येत्या 17 नोव्हेंबर रोजी सुरू होतील, तर टेंभू योजनेचे पंप येत्या 15 डिसेंबर रोजी सुरू होतील. तर टेंभूचे पाणी 15 जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्रात पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता म्हैसाळ प्रकल्पाचा पंप गृह क्र.1 सुरु करण्यात आला आहे.

error: Content is protected !!