Milk Rate : दूध दरात घसरण; सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध दरवाढीच्या मागणीसाठी (Milk Rate) शेतकरी संघटनांसह राज्यभरातील शेतकऱ्यांनी आज (ता.24) तीव्र आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपला रोष व्यक्त केला. तर शेतकरी संघटनांनी सरकारच्या 34 रुपये प्रति लिटर दर (Milk Rate) देण्याचा आदेशाची 21 जिल्ह्यांमध्ये होळी करत सरकारचा निषेध केला. सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांसह आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

चार महिन्यापूर्वी राज्यातील दूध उत्पादकांना प्रति लिटर 34 रुपये दर देण्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक दूध संघांनी सध्या 34 रुपयांऐवजी 27 रुपये प्रति लिटरपर्यंत दुधाच्या दरात घसरण केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत मोठे नुकसान सोसावे आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये रयत क्रांती संघटना, किसान सभा या संघटनांसह अन्य शेतकरी संघटनांनी ठिकठिकाणी सरकारच्या आदेशाची होळी करत सरकारचा निषेध केला.

उत्पादन खर्चात वाढ (Milk Rate Falls In Maharashtra)

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना चारा नाही तसेच पशुखाद्याचे भावही वाढलेले आहेत. मात्र अशा परिस्थितीत दूध संघांकडून शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर इतका नगण्य दर दिला जात आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा दूध दराबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याने आज सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला, असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. दुष्काळ असल्याने दुधाचे उत्पादन घटले आहे. अशा परीस्थितीत मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दूध दर वाढायला पाहिजे होते. मात्र, याउलट मागणी कमी आणि उत्पादन अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दुध कंपन्यांचा हा दर पाडण्यासाठी केलेला कांगावा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!