Milk Rate : दूध दराबाबत सरकारची बैठक; पहा ‘काय’ झालाय निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव (Milk Rate) मिळावा. यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यापूर्वी सरकारकडून त्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांनी (Milk Rate) पुढाकार घ्यावा. असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी (ता.21) राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या. (महानंद) मुंबईचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त अजित पवार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ विभागीय प्रमुख आणि राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघाचे प्रतिनिधी, पशुखाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निर्धारित दरास कंपन्यांचा नकार (Milk Rate In Maharashtra)

राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर 34 रुपये दर जाहीर केला आहे. मात्र दूध उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांकडून 27 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करत असल्याचे शेतकरी नेत्यांनी या बैठकीत नमूद केले. यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. असेही यावेळी सांगण्यात आले. तर सरकारने ठरवून दिलेल्या दरात दूध खरेदी करण्यासाठी दूध उत्पादक कंपन्यांनी या बैठकीत नकार दर्शवला आहे. त्यामुळे या बैठकीत ठोस तोडगा निघू शकला नसल्याचे सांगितले जात आहे.

सरकारच्या आदेशाची होळी करणार

राज्य सरकारच्या दुधाला 34 रुपये प्रति लिटर दर देण्याचा आदेशाला कोणतीही किंमत नसल्याचे दूध उत्पादक शेतकरी संघटनेने बैठकीनंतर म्हटले आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व दूध संकलन केंद्रांबाहेर या सरकारी आदेशाची होळी केली जाणार आहे. तसेच रास्ता रोको करत दूध उत्पादक शेतकरी आपला रोष व्यक्त करतील. असेही दूध उत्पादक शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

सध्या दुधातील भेसळ रोखण्यासाठीही सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. भेसळ रोखण्यात यश आले, तरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देणे शक्य होणार आहे. दुधाची गुणवत्ता टिकविणे अत्यंत आवश्यक आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती गठित करण्यात येत असून, त्यांच्यामार्फत तपासणीअंती दूध भेसळ करणाऱ्यांवर तसेच भेसळयुक्त दूध घेणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी संबंधित विषयावर मंत्रिमंडळात चर्चा करुन यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

error: Content is protected !!