हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जागतिक पातळीवर दूध उत्पादनात (Milk Rate) भारताने आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. मात्र, आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर (Milk Rate) लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. असे राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे अध्यक्ष मिनेश शाह यांनी म्हटले आहे. ते बंगळुरू येथील एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात दूध दरावरून आंदोलन सुरु असताना शाह यांचे हे विधान अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.
सध्यस्थितीमध्ये जगातील एकूण दूध उत्पादनापैकी भारतात जवळपास एक चतुर्थांश (24 टक्के) दूध उत्पादन (Milk Rate) होत आहे. अशाच पद्धतीने भारतात दूध उत्पादन वाढत राहिल्यास पुढील 10 वर्षांमध्ये जगाच्या 30 ते 35 टक्के उत्पादन हे एकट्या भारतात होईल. त्यामुळे दूध आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्यात करणाऱ्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मिनेश शाह यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे. दरम्यान, मागील काही वर्षात देशातील तूप आणि लोणी निर्यातीत वाढ झाली आहे. जर देशामध्ये वाढीव दूध उत्पादन होत असेल ते चांगलेच आहे. मात्र त्याचा अतिरेक होऊन ते वाया जाऊ नये, यासाठी निर्यातीवर लक्ष केंद्रीत करण्याची नितांत गरज आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
पाच वर्षात 22 टक्क्यांनी वाढ (Milk Rate On Minesh Shah NDDB)
केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभागाच्या आकडेवारीनुसार, 2022-23 यावर्षात देशात एकूण 230.58 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले आहे. ज्यात मागील पाच वर्षांमध्ये 22.81 टक्क्यांनी मोठी वाढ नोंदवली गेली आहे. 2018-19 मध्ये देशातील दूध उत्पादन 187.75 दशलक्ष टन इतके होते. याच माहितीच्या आधारे विचार केल्यास शाह यांनी केलेले विधान दूध उत्पादकांच्या हिताचे आहे. कारण मागील पाच वर्षात दूध उत्पादनात मोठी वाढ झाली. मात्र हे दूध देशातच वापरले जात असल्याने, परिणामस्वरूप दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दूध प्रक्रिया करून अतिरिक्त दुधापासून बनलेले दुग्धजन्य पदार्थ देशाबाहेर पाठवून शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.