हॅलो कृषी ऑनलाईन: दुधाचे दराने (Milk Rate) नेहमीच दूध उत्पादक शेतकर्यांना हुलकावणी दिलेली आहे. असेच काही यावेळी सुद्धा झालेले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विकास विभाग यांच्यावतीने आज शुक्रवार 15 मार्च रोजी जाहीर केलेल्या पत्रकानुसार 13 मार्च बुधवार रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार राज्यातील सर्व सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकर्यांना 3.5 फॅट आणि 8.5 एस एन एफ असलेल्या गुणप्रती करिता 27 रुपये प्रती लिटर न देता आता नव्याने अवघे 25 रुपये (Milk Rate) देण्यात येणार आहे.
राज्यभरातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणार्या दूध उत्पादक शेतकर्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने 5 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या बैठकीत घेतला होता. तसेच यावेळी 3.5 फॅट आणि 8.5 एस एन फ ला 27 रुपये प्रति लिटर असा दर देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर 26 फेब्रुवारी 2024 रोजी यात बदल करत हे अनुदान आणखी काही दिवस पुढे वाढविण्यात यावे असा निर्णय दिला. ज्यामुळे अनेक शेतकर्यांना याचा दिलासा मिळाला. मात्र प्रत्यक्षात हे अनुदान अद्यापही काही शेतकर्यांच्या खात्यावर न आल्याने शेतकरी विचारणा करत होतो. त्यातच 11 मार्च रोजी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांनी ज्या शेतकर्यांचे अनुदान रखडलेले आहेत ती अंतिम यादी संकलन केंद्रांना जमा करण्यासाठी मुदत वाढ दिली होती.
मात्र आता या नव्या 25 रुपये प्रति लिटर निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कधी चारा टंचाई तर कधी विविध साथींच्या आजारांची पशुधनावर होणारी बरसात तर कायमस्वरूपी असलेला दूध दर प्रश्न यात दूध उत्पादक शेतकरी सतत भरडत आला आहे. यातून अनेक आंदोलने उभी राहिली, उपोषणे झाली. मात्र यावर कायमचा तोडगा काही निघाला नाही.
असेच एक आंदोलन काही दिवसांपूर्वी राज्यभर झाले. ज्यातून काही अंशी मार्ग काढण्यासाठी विद्यमान शासनाने दूध अनुदान देण्याचा तोडगा काढला होता. मात्र आता नव्या आदेशामुळे दूध उत्पादक शेतकरी (Milk Rate) पुन्हा मेटाकुटीला आला आहे.