Milk Subsidy : 5 रुपये दूध अनुदान योजनेस एक महिना मुदतवाढ; वाचा जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन ; राज्य सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान (Milk Subsidy) देण्यासाठी चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यात दूध अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान दिले जाते. यापूर्वी ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जीआर जारी करत राज्य सरकारने या योजनेस आणखी एक महिना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 11 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत दूध अनुदान (Milk Subsidy) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोन महिन्याचे अनुदान मिळणार’ (Milk Subsidy For Dairy Farmers)

नुकत्याच संगमनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे पशुपालन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेला एक महिना मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज अधिकृतरित्या राज्याच्या पशुपालन व दुग्धविकास मंत्रालयाकडून जीआर जारी करण्यात आला आहे. अर्थात जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही महिने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति रुपये पाच रुपये अनुदान मिळणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात म्हटले होते.

काय आहे ‘ही’ योजना?

मागील काही महिन्यांपासून राज्यातील दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अशातच दूध उत्पादक शेतकरी संघटनांनी आंदोलन करत, 34 रुपये लिटर हा राज्य सरकारने निश्चित केलेला दर प्रमाण मानला. आणि त्यानुसार गायीच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून ही योजना राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. ही योजना 11 जानेवारी 2024 पासून राज्यभरात राबविली जात आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402261047028001.pdf)

error: Content is protected !!