Millet Center : बाजरी उत्कृष्टता केंद्र अखेर सोलापूरातच; राज्य सरकारचा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बाजरी उत्कृष्टता केंद्र (Millet Center) स्थापन करण्यावरून खूपच रस्सीखेच सुरु होती. हे केंद्र सोलापूर किंवा बारामती या दोन ठिकाणी सुरु करण्यावरून दोलायमान परिस्थिती होती. मात्र, आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने काही निर्णय घाईघाईत उरकले असून, त्यात अखेर बाजरी उत्कृष्टता केंद्र हे सोलापूर या ठिकाणी उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता बाजरी पिकावरील प्रक्रिया उद्योगासाठी हे केंद्र (Millet Center) खूपच महत्वाचे ठरणार असल्याने, सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सर्वाधिक उत्पादन सोलापुरात (Millet Center In Solapur)

सुरुवातीला सोलापुरात हे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, पुन्हा हे केंद्र बारामतीला हलविण्यात होते. अशातच सोलापुरात बाजरीचे अधिक उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. ज्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी पाहता राज्य सरकारने आता बाजरी उत्कृष्टता केंद्र (Millet Center) हे सोलापूरातच होणार असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे. सोलापूर जिल्ह्यात बाजरी, ज्वारीसहित अन्य भरडधान्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. ज्यामुळे राज्य सरकारने अखेर सोलापुरात हे उभारण्यावर एकमत केले आहे.

शेतकऱ्यांना फायदा होणार

सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने अंतिमतः सोलापुरात हे बाजरी उत्कृष्टता केंद्र (Millet Center) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ज्यामुळे जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बाजरी या पिकावर प्रक्रिया करण्यासाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावणार आहे. ज्यामुळे बाजरी वापर वाढून, उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होणार आहे.”

उत्पादन वाढीस मदत होणार

सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका आदी भरड धान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आता या केंद्राच्या उभारणीनंतर या सर्व पिकांच्या उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्यसाखळी विकास, प्रचार आणि प्रसिद्धीचा कार्यक्रम आखला जाईल. तसेच तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हैदराबादच्या राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्थेमार्फत (आयआयएमआर) सामंजस्य करार जाईल. असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!