Millets Festival : 17 ते 21 जानेवारीला पुण्यात ‘तृणधान्य महोत्सव’; शेतकऱ्यांना सुवर्णसंधी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी पणन मंडळाच्या वतीने ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-2024’ चे (Millets Festival) आयोजन करण्यात आले आहे. 17 ते 21 जानेवारी रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल (Millets Festival) मिळावा, हा यामागील उद्देश आहे.

कोणाचा सहभाग असणार? (Millets Festival For Farmers)

‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-2024’ या महोत्सवामध्ये (Millets Festival) राज्याच्या विविध भागातून आलेले तृणधान्य उत्पादक शेतकरी, तृणधान्य प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना सुमारे 50 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या महोत्सवामध्ये अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी नाविण्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

तृणधान्याचे महत्व

संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात ज्वारी व बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ज्वारी व बाजरी हे तृणधान्यात जास्तीत जास्त ऊर्जा देणारे पीक आहे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रीत करते. मॅग्नेशिअम व पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत-रक्तदाब नियंत्रीत करण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रीत करण्यास सुध्दा मदत होते. बाजरीमध्ये सल्फरयुक्त अमिनो आम्ल असल्यामुळे लहान मुले व गर्भवती मातांसाठी उपयुक्त आहे. यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. हृदयास सक्षम बनवते. मधुमेह व कॅन्सर रोधक असते. आपल्या शरिरातील हाडांना मजबुती देण्याचे काम करते.

राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात मिलेट उत्पादने, मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते संमेलन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ग्राहकांनी मिलेट खरेदीसह विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!