हॅलो कृषी ऑनलाईन : धानाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (Minimum Support Price) वाढ करण्याची मागणी पंजाब सरकारकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. धानाला पुढील वर्षीपासून 3 हजार 284 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी पंजाब सरकारने एका प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांना धानाच्या विक्रीतून जास्तीत जास्त नफा मिळवता यावा. यासाठी पंजाब सरकारने केंद्राकडे (Minimum Support Price) ही मागणी केली आहे.
पंजाब सरकारचा प्रस्ताव (Minimum Support Price Of Cotton And Paddy)
पंजाब सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, 2024-25 या वर्षासाठी धानाची किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price) ‘सामान्य’ जातीसाठी 3,284 रुपये प्रति क्विंटल तर उच्च जातीच्या तांदळासाठी 3,324 रुपये प्रति क्विंटल निश्चित करावी. मागील वर्षी पंजाब सरकारने धानाचा एमएसपी 3,184 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने धानासाठी 2,183 रुपये प्रति क्विंटल एमएसपी निश्चित केला होता. त्यामुळे यावर्षीच्या पंजाब सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकार धानासाठी काय एमएसपी जाहीर करणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
कापसाचा एमएसपी 10,767 रुपये
याशिवाय पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे पुढील हंगामासाठी कापूस या पिकाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) 10,767 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित करण्याची मागणी केली आहे. मागील वर्षी पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे कापसाला 8,860 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत देण्याची मागणी केली होती. त्यावर निर्णय घेत केंद्र सरकारने ७०२० रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसासाठी निर्धारित केला होता.
पंजाब हे प्रमुख धान उत्पादक राज्य असून, पंजाबमध्ये खरीप धान तर रब्बी हंगामात गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यावर्षी राज्यात शेतकऱ्यांनी सुमारे 32 लाख हेक्टरवर धानाची लागवड केली होती. त्यानुसार यावर्षी पंजाबमध्ये 205 लाख टनांहून अधिक धानाचे उत्पादन होण्याची अपेक्षा सरकारला आहे. 2020-21 च्या खरीप हंगामात 208 लाख टन धानाचे उत्पादन झाले होते. यावर्षी आतापर्यंत पंजाबमध्ये 185 लाख टनांहून अधिक धानाची खरेदी झाली आहे.