Mirchi Lagwad : दीड एकर मिरची पिकातून 4 लाख रुपयांची केली कमाई! कशी केली लागवड व देखरेख?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी (Mirchi Lagwad) | शेतीत काय पडलयं राव असा प्रश्न करणाऱ्यांसाठी परभणी जिल्हातील एका तरुण शेतकऱ्यांने सहा महिन्यात मिरची सारख्या पिकांमधून तब्बल पावणे चार लाख रुपयांचे उत्पन्न काढत तिखटं पण प्रेरणादायी उत्तर दिले आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या वाघाळा गावचा तरुण शेतकरी ऋषिकेश घुंबरे याची सध्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

ऋषिकेशने दीड एकर क्षेत्रावर घेतलेल्या मिरची पिकातून थोडेथोडके नवे तर तब्बल पावणे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळवल्याने त्याची ही चर्चा होत आहे. शेती न परवडणारी झाली आहे? शेतीत काय पडलंय? असे नकारार्थी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी ऋषिकेश या प्रयोगशील व मेहनती तरुण शेतकऱ्याने सकारात्मक उत्तर दिलं आहे. ऋषिकेश घुंबरे (वय २८ ) यांच्याकडे वाघाळा शिवारामध्ये दहा एकर बागायती शेती आहे.

वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर शेती पाहणाऱ्या आईला मदत करण्यासाठी ऋषिकेश शेतीकडे वळला आहे. मागील अनेक वर्षांपासुन शेतात ऊसाचे पीक घेतल्या गेल्याने व त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने काही तरी वेगळे पिक शेतात घेण्याचा विचार ऋषिकेश करत होता. मागील खरीप हंगामामध्ये सोयाबीन पीक घेतल्यानंतर या क्षेत्रावर २५ डिसेंबर रोजी ऋषिकेशने दीड एकर शार्क १ वाणाच्या मिरचीची लागवड केली. Mirchi Lagwad

मिरचीचे हे वाण लाल मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. लागवडीनंतर तब्बल दीड वर्ष यातून उत्पन्न मिळत असल्यामुळे या वाणाची निवड करण्यात आली. लागवडीनंतर काही महीण्यातच मिर्ची तोडणी सुरु झाली. आतापर्यंत ३४ क्विंटल हिरव्या मिरची विक्रीतून १ लाख २ हजार रुपये तर ११ क्विंटल लाल वाळवलेल्या मिरचीला २५० रुपये प्रती किलो दर मिळाल्याने २ लाख ७५ हजार रुपये असे ३ लाख ७७ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने पुढील काही दिवस हिरव्या मिरचीचे तोडे होणार आहेत. साधारण लागवडी नंतर १५ महिने हे पिक शेतात उत्पादन देत राहते. त्यामुळे पुढील ८ ते ९ महिने या पिकातून आणखी उत्पन्न मिळणार आहे .

अशी केली लागवड व देखरेख (Mirchi Lagwad)

२५ डिसेंबर २०२२ रोजी शेताची पूर्व मशागत करत ४ बाय १ अंतराने मल्चींग केलेल्या बेडवर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून शार्क १ या मिरची वाणाची १५ हजार रोपे लागवड केली. यात २ हजार रोपांची तुट झाली तर त्यातील १३ हजार रोपे जीवंत राहीले. प्रारंभी बेडमध्ये शेणखतासह सुपर फॉस्फेट १ क्विंटल, निमपेंड १ क्विंटल , पोटॅश ५० किलो, मायक्रोन्युट्रीएन्ट १५ किलो रासायनिक खत मातील मिसळून दिला. आतापर्यंत किड व बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशक व पिप्रोनील च्या ५ फवारण्या केल्या आहेत. उन्हाळ्यात गरजेनुसार पाणी दिले. मिरची तोडणी मजुरां कडून करून घेतली. तोडणीसाठी प्रती किलो दहा रुपये एवढा खर्च आला आहे.

error: Content is protected !!