Monsoon Update : यंदा चांगला पाऊस पडणार; नोआनंतर ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेचाही अंदाज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, यंदाच्या पावसाळ्याबाबत (Monsoon Update) मोठी अपडेट समोर आली आहे. कारण आता ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेने देखील आपला अहवाल जारी करत, “सध्या मॉन्सूनवर सुरु असलेला एल-निनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात संपुष्टात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात यंदा चांगला पाऊस बरसण्याचे संकेत (Monsoon Update) मिळत असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Monsoon Update Good Rain This Year)

मागील वर्ष भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि अन्य देशांमधील शेतकऱ्यांसाठी एल-निनोच्या प्रभावामुळे पूर्णपणे निराशाजनक राहिले. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये तर दुष्काळ घोषित करण्यात आला. त्यामुळे आता वर्षभर उन्हाचे चटके सोसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. एल-निनो प्रभाव संपुष्टात येऊन, यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज, मागील पंधरवड्यात काही हवामान संस्थांनीही व्यक्त केला होता. त्यात आता ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेनेही होकारार्थी संकेत दिल्याने, यंदा पावसाळा चांगला राहण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.

एल-निनो ओसरतोय

अमेरिकी हवामान संस्थेनेही (नोआ) 15 दिवसांपूर्वीच एल-निनोचा प्रभाव संपुष्टात येऊन, यंदा भारतात चांगला पाऊस पडू शकतो असे म्हटले आहे. तसेच या आठवड्याच्या आपल्या साप्ताहिक हवामान अंदाजातही नोआने, “जून 2023 मध्ये प्रशांत महासागरात तयार झालेला एल-निनोचा अतिउच्च प्रभाव डिसेंबर 2023 पासून हळूहळू कमी होत असल्याचे म्हटले आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये हा प्रभाव पूर्णतः संपुष्ठात येऊन, यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याचे म्हटले आहे.

स्कायमेट, आयएमडीचा सुरात सूर

दरम्यान, मागील पंधरवड्यात देशातील ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेनेही भारतात यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे म्हटले होते. तर भारतीय हवामानशास्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी देखील एल-निनो प्रभाव संपुष्टात येऊन, देशात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मागील आठवड्यात म्हटले होते. त्यामुळे आता यंदाचा पावसाळा चांगला राहिल्यास, त्याचा राज्यासह देशातील शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!