Mosambi Dieback: तुमच्या मोसंबीवर ‘डायबॅक’ रोग तर नाही ना? जाणून घ्या कारणे, करा व्यवस्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाडयातील मुख्य फळपिक मोसंबीवर डायबॅक (Mosambi Dieback) रोगाचा प्रादुर्भाव नेहमीच आढळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते. या रोगाला ‘आरोह’ या नावाने सुद्धा ओळखतात. या रोगाची नेमकी कारणे कोणती आणि यावर पूर्णपणे नियंत्रण कसे मिळवावे याविषयी ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीतर्फे’ शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माहिती दिलेली आहे. या लेखाद्वारे ती जाणून घेऊ या.

डायबॅक रोगाची कारणे ( Causes of Dieback Disease)

 • अयोग्य जमिनीची निवड: मोसंबीसाठी हलकी, मध्यम व चुनखडी विरहीत जमीन योग्य असते.  परंतु, बहुतेक शेतकरी मोसंबीची लागवड ही अतिभारी, चुनखडीयुक्त किंवा क्षारयुक्त जमिनीत करतात. तसेच नदी, ओढयाच्या काठावरील काळया किंवा पोयटयाच्या जमिनीत झालेल्या लागवडीमुळे माती व पाण्याव्दारे होणाऱ्या बुरशीची वाढ झपाटयाने होते. जे डायबॅक रोग (Mosambi Dieback) प्रसारास कारणीभूत ठरते.
 • पाण्याचा अयोग्य वापर: पाण्याचा अमर्यादित वापर यामुळे मोसंबी झाडाचा बुंधा सतत पाण्याच्या संपर्कात राहतो, यामुळे फायटोप्थोरा नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणावर होतो. पाण्याच्या संपर्कामुळे रोगट झाडापासून इतर झाडास रोगाची लागण होते. अति पाण्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील क्षार वर येते, जमिनीत हवा खेळती राहत नाही, जमिनीत कर्ब-नत्राचे प्रमाण असमतोल होते. जमीन अल्कली झाल्यामूळे  सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता होऊन, झाडे कमजोर होतात, डायबॅक (Mosambi Dieback) रोगाला सहज बळी पडतात.
 • चुकीच्या पद्धतीने आंतरमशागत: लोखंडी नांगर, किंवा ट्रॅक्टरव्दारे खोल व अगदी झाडाच्या बुंध्यापर्यंत नांगरणी, वखरणी केल्याने झाडाच्या मुख्य मुळयांना इजा होते. दुय्यम मुळया तुटणे किंवा उपसून बाहेर येणे, ब-याच वेळा झाड फाटणे, असे प्रकार घडतात आणि त्यामधून जमिनीव्दारे पसरणा-या रोग – जंतुचा शिरकाव होऊन झाडे रोगग्रस्त (Mosambi Dieback) होतात.
 • सेंद्रिय खताचा अभाव: शेणखत किंवा सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खतांचा विशेषतः युरिया किंवा मिश्र खतांचा अनियंत्रित वापरामुळे काही अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी तर काही अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून झाडाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व झाड झपाट्याने डायबॅक रोगास (Mosambi Dieback)बळी पडते.
 • पीक संरक्षणाचा अभाव: अजूनही बहुतेक शेतकरी मोसंबीवर पीक संरक्षण उपायाचा वापर केला जात नाही, त्यामुळे रोग/किडीची तीव्रता सतत वाढत जाऊन, नंतर झाड पूर्णपणे वाळते.
 • इतर कारणे: अयोग्य रोपांची निवड, बहाराच्या वेळी अवाजवी जास्तीचा ताण, एका वेळी दोन किंवा तीन बहाराची फळे धरणे, फळ धारणा अवस्थेत पाण्याचा ताण, गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी न देणे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव व सूत्रकृमीचा प्रादुर्भाव यामुळे सुद्धा डायबॅक (Mosambi Dieback) रोग होऊ शकतो.

डायबॅक रोग व्यवस्थापन ((Mosambi Dieback Management)  

 • शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, योग्य निचरा करा.
 • प्रत्येक झाडास ठिबक सिंचनाद्वारे मर्यादित पाणी पुरवठा करा. 
 • बागेस नियमित देण्याच्या खताच्या मात्रा हया सेंद्रिय खतामधूनच द्या. उदा. शेणखत, रैलीमाल (७:१०:५) स्टोरामील, ब्ल्डमील, मासळी खत, निंबोळी पेंड, शेंगदाणा पेंड
 • असेंद्रिय खतामध्ये अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट अशा गंधकयुक्त खताचा वापर करावा.
 • आंतरमशागत करतांना झाडाच्या मुळांना जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी
 • मोसंबीवर एका वर्षात एकच बहार घ्या, तोच बहार नियमित ठेवा.
 • झाडावर जास्तीत जास्त ५०० ते ६०० एवढीच फळे घ्यावी.
 • रोगग्रस्त बागांना पाण्याचा जास्त ताण देऊ नये. साधारणतः: हलक्या जमिनीत १५ दिवस, मध्यम जमिनीत २१ दिवस व भारी जमिनीत ३० दिवस पाणी तोडावे व ताण तोडताना २५ टक्के, ५० टक्के व शेवटी १०० टक्के पाणी तीन ते चार दिवसांच्या अंतराने देऊन ताण मोडावा. 
 • रोगट झाडावरील सर्व फळे तोडून झाड निरोगी होईपर्यंत त्याच्या कायिक वाढीवर भर देणे आवश्यक आहे.
 • झाडावर फळे असताना बागेस पाण्याचा ताण पडू देऊ नये.

पीक संरक्षण उपाय: (Plant Protection Measures For Mosambi Dieback)

१.   डिंक्या रोगग्रस्त भाग एक इंच निरोगी भागासह खरडून काढावा. हा खरडलेला भाग १ ग्रॅ. मरक्युरिक क्लोराईड १ लिटर पाण्यात मिसळून धुऊन काढावा.

२. वर्षातून दोन वेळेस (पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यांनंतर) २५ ग्रॅम कॉपरऑक्सीक्लोराईड १० लि. पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या खोडावर ओतावे.

३. २७ ग्रॅम मेटालेक्झील + १० लि. पाणी + स्टीकर यापासून तयार झालेला बोर्डोपेस्ट प्रत्येक झाडाच्या खोडावर एक मीटर उंचीपर्यंत लावावा.

४. जमिनीत सुत्रकृमी (निमॅटोड) असल्यास फ्युराडॉन नावाचे औषध प्रति झाडास १०० ग्रॅम जमिनीतून द्यावे.

५. बागेस नवीन पालवी येते वेळेस वर्षातून तीनदा आंतरप्रवाही कीटकनाशक, बुरशीनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या करा.

error: Content is protected !!