Mukt Sanchar Gotha: मुक्त संचार गोठा; दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नफ्याची आणि यशाची गुरुकिल्ली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय दूध उत्पादक शेतकरी (Mukt Sanchar Gotha) वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली. 90 टक्क्यांपेक्षाही जास्त दूध उत्पादकाकडे 2 ते 3 याच प्रमाणात गाई आहेत. गाईंची संख्या व वंशावळीची गुणवत्ता वाढल्याशिवाय दूध उत्पादक शेतकरी फायद्यात येणे शक्य नाही.

दूध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये मुक्त संचार गोठ्याला (Mukt Sanchar Gotha) फार महत्व आहे.

दुभत्या गायी आणि म्हशीचे संगोपन करताना मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकर्‍यांचे कष्टही कमी होतात व जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहते, परीणामत: दूध उत्पादनात वाढ होते.

मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याचे फायदे (Benefits Of Mukt Sanchar Gotha)

  • मुक्त गोठा पद्धतीचा गोठा हा कमीत कमी खर्चात सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी करू शकतो.
  • मुक्त संचार गोठ्यात गव्हाण पूर्व किंवा पश्चिम दिशेला केल्यास  वैरण खाताना गाईंचे तोंड सूर्याच्या उगवत्या किंवा मावळत्या दिशेला असते, यामुळे  गोठा कोरडा व निर्जंतुक राहण्यास मदत होते.  गाई कायम स्वच्छ राहतात व दगडी (मस्ताइटिस ) सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते.
  • संकरित गाईंचा सांभाळ करताना त्यांना वर्षभर चांगली सावली व बसण्यासाठी कोरडी जागा लागते.  मुक्तसंचार  गोठ्या मध्ये झाडांची, किंवा शेडची सावली गाईंना लाभदायक ठरते.  उन्हाळ्यात किंवा उन्हाच्या वेळी धापा टाकण्याचे प्रमाण कमी होते.  यामुळे गाईंवरील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारकशक्ती टिकण्यास मदत होते. परिणामतः दूध उत्पादन वाढते.
  • गाई व वासरे मुक्त असल्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होऊन शरीराची संतुलित वाढ होते.  गाई चांगल्या प्रकारे माजावर येतात.  माजाची लक्षणे लवकरात लवकर ओळखता येतात.  गाय माजावर आली की बाहेर काढून, कृत्रिम रेतन करून माज कमी झाल्यावर पुन्हा गोठ्यात सोडता येते.
  • पाणी पिण्याच्या हौदामध्ये किंवा कुंडीत गाईंना तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळते.  हिरवा चारा, वाळला चारा व पिण्याचे पाणी या सर्व माध्यमातून जेव्हा गाईच्या शरीरात 4-5 लिटर पाणी जाते, तेव्हा गाईच्या कासेमध्ये कमीतकमी एक लिटर दूध तयार होते.  यामुळे तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुक्त गोठा हा एकमेव पर्याय आहे.
  • मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामध्ये गाईंना खरारा करणे सोपे जाते.  यासाठी एखादा खांब मधोमध रोवून, त्यावर नारळाचा काथ्या ओला करून गुंडाळावा.  गाई त्यावर आपले शरीर घासण्याचा प्रयत्न करतात.  यामुळे गाई तणावमुक्त होऊन त्यांची त्वचा व्यवस्थित राहते.
  • दूध उत्पादक शेतकरी  वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीमध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा शेण उचलतो. परंतु मुक्त गोठा पद्धतीमध्ये शेण महिन्यातून एकदा काढले तरी चालते.  सूर्यप्रकाशामुळे शेण वाळते जाऊन शेणखताची भुकटी तयार होते. त्यामध्ये गाईची लघवी मिसळली गेल्याने उत्तम प्रकारचे शेणखत तयार होते.  त्याचबरोबर हुमणी नावाच्या किड्याची निर्मिती सुद्धा या भुकटी झालेल्या खतामध्ये होत नाही.  हे शेणखत शेती चे उत्पादन वाढविण्यास उपयोगी पडते.  मुक्त गोठा पद्धतीमध्ये फक्त पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असे पर्यंत  दररोज शेण उचलावे लागते.
  • मुक्त गोठा पद्धतीमध्ये शेतकऱ्याला जनावरांची जागा बदलणे, शेण उचलणे, पाणी पाजणे ही तिन्ही कामे करण्याची आवश्यकता राहत नाही. कष्ट वाचते, वेळ वाचतो. परिणामी मजुरांवरील खर्च वाचतो.
  • गाईभोवती कंपाउंड असल्याने रानटी प्राणी किंवा पिसाळलेले कुत्रे यापासून गाईंचे संरक्षण फक्त मुक्त संचार गोठ्या पद्धतीमध्येच शक्य आहे. 
  • प्रत्येक वयोगटाच्या जनावरांची व्यवस्था स्वतंत्रपणे करता येते.  व्यायलेल्या गाई, गाभण गाई व वासरे यांचे कप्पे स्वतंत्र केल्याने चारा व खुराक (पशुखाद्य) उत्पादनाप्रमाणे देणे सोयीचे जाते.  त्यामुळे अनावश्यक खर्च वाचून बचत होते. नफ्यात वाढ होते.
  • मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामुळे गाईंमधील आजारांचे प्रमाण देखील कमी होते. अशा प्रकारे बहुपयोगी मुक्त गोठा पद्धत आता लोकप्रिय होत आहे

मुक्त संचार गोठ्यात घ्यायची काळजी (Care Tobe Taken in Mukt Sanchar Gotha)

एका गाईला किंवा म्हशीला मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात मोकळे सोडण्यासाठी कमीत कमी 200 चौ.मी. जागा लागते. एक गुंठा जमीन क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो. गाईला मुक्त सोडण्यापूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे अर्ध्या जाळी युक्त कंपाउंड करून आत गव्हाण व पाण्याच्या हौदाची व्यवस्था करणे आवश्यक असते. गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात.

या कालावधीत शेतकऱ्याने सतर्कता बाळगायला हवी.  गाई मोकळ्या सोडल्यावर त्या एकमेकींना मारतील या भीतीने शेतकरी मुक्त गोठा पद्धत अवलंब करण्यापासून माघार घेतात.  परंतु पहिले दोन दिवस सवय लागल्यावर गाई एकमेकांना मारत नाहीत.  जर एखादी गाय इतर गाईंना मारत असेल तर तिला पायकूट घालून आपण प्रतिबंध करू शकतो. गाईच्या तोंडाच्या म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या  गुडघ्याच्या थोडेसे वर असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट  घालणे होय.  अशाप्रकारे आपण जनावरांच्या हालचालीवर प्रतिबंध घालू शकतो (Mukt Sanchar Gotha).

लेखक: डॉ. शैलेश मदने

error: Content is protected !!