Mulching Paper : अधिक उत्पादनासाठी किती लांब-रुंद असावा मल्चिंग पेपर; वाचा संपूर्ण माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा (मल्चिंग शीट) (Mulching Paper) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मल्चिंग पेपर हा प्रत्यक्षात हवामानातील बदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो. मल्चिंग पेपर हा पिकांचे किंवा फळ पिकांचे सुरक्षा कवच म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे मल्चिंग पेपर हे तंत्र फळ पिकांच्या लागवडीसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. मल्चिंग पेपर (Mulching Paper) हा केवळ वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण नियंत्रित करत नाही. तर आर्द्रता, कार्बन डायऑक्साइड नियंत्रित ठेवतो. ज्यामुळे पिकांसाठी योग्य तापमान, हवामान नियंत्रित राहण्यास मदत होते.

काय आहे मल्चिंग पेपर? (Mulching Paper Use In Agriculture)

मल्चिंग पेपर (Mulching Paper) हा एक प्लॅस्टिकचा कागद असतो. जो पिकांच्या भोवतीची जमीन झाकण्यासाठी वापरला जातो. सध्या आपल्याला मल्चिंग पेपर विविध रंगात आणि जाडीत बाजारात उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. शेतकरी त्यांच्या गरजेनुसार मल्चिंग पेपर खरेदी करू शकतात. काळ्या, निळ्या, पारदर्शक, पिवळ्या, लाल आणि तपकिरी रंगाच्या मल्चिंग शीट्स बाजारात उपलब्ध आहेत. मल्चिंग पेपरचा वापर जमिनीतील आर्द्रता संतुलित ठेवण्यासाठी, मुळांच्या ठिकाणी जमिनीचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी, तसेच जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रिया सुधारण्यासाठी तसेच अन्य फायदयांसाठी केला जातो.

पिकांच्या उत्पादनात वाढ होते

मल्चिंग पेपर (Mulching Paper) हा मातीची धूप रोखतो. ज्यामुळे पिकांना आवश्यक पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते. याशिवाय तण नियंत्रण करण्यात मल्चिंग पेपर खूप फायदेशीर ठरतो. याशिवाय पिकासाठी पाण्याचा कमी वापर होतो, तसेच ओलावा टिकून राहतो. त्यामुळे पिकांच्या उत्पादनातही वाढ होते. या पेपरमुळे जमिनीचा वरचा थर प्रखर उन्हाने कडक होत नाही. परिणामी पीक निरोगी राहते. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे भाजीपाला पिके घेतल्यास 35 ते 60 टक्के अधिक वाढ दिसून येते. या मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पपई पिकामध्ये 60 ते 65 टक्के तर इतर पिकांमध्ये 25 ते 50 टक्के अधिक वाढ दिसून आल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे.

किती लांबी, रुंदी आवश्यक?

भाजीपाला आणि फळ पिके घेताना आपण 90 सेमी ते 180 सेमी रुंदीचा मल्चिंग पेपर वापरू शकतो. पेपरची जाडी पिकावर अवलंबून असते. सुमारे 20 ते 40 मायक्रॉनचे प्लॅस्टिक मल्चिंग पेपर फळांच्या लागवडीसाठी योग्य आहे. हा मल्चिंग पेपर आपण फळ पिकांच्या खोडाभोवती लावू शकतो. प्लास्टिक मल्चिंग पेपर व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय असून, बरेच शेतकरी तोच वापरतात.

प्लास्टिक मल्चिंग पेपरचे तीन प्रकार

1. काळा मल्चिंग पेपर : काळा मल्चिंग पेपर जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवतो. तसेच पिकांचे तणांपासून संरक्षण करतो. जमिनीत ओलावा टिकवून ठेवतो. फळ पिकांसाठी काळा मल्चिंग पेपर उत्तम मानला जातो.

2. सिल्‍वर मल्चिंग पेपर : सिल्व्हर किंवा दुधाळ रंगाच्या मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पिकांच्या मुळाशी तापमानाचे नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. याशिवाय पिकांच्या मुळाशी तण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

3. पारदर्शक मल्चिंग पेपर : पारदर्शक मल्चिंग पेपर हा मुख्यतः थंड हवामान आणि सौर किरणांच्या परावर्तनासाठी वापरला जातो. हिवाळ्यात लागवड केलेल्या पिकांसाठी हा पेपर उत्तम मानला जातो.

error: Content is protected !!