Murghas: मुरघास निर्मिती, देते जनावरांसाठी वर्षभर चाऱ्याची हमी!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालन व्यवसाय यशस्वी करायचा असल्यास सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पशुखाद्य (Murghas). कारण जनावरांना योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रतिचे पशुखाद्य पुरविले तर दुधाचे चांगले आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. जनावरांना देण्यात येणार्‍या वेगवेगळ्या पशुखाद्यांपैकी  हिरवा चारयात सर्वात अधिक पौष्टिक घटक असतात. परंतु हा हिरवा चारा जनावरांना वर्षभर उपलब्ध होईलच असे नाही. यावर उपाय म्हणजे मुरघास (Murghas) निर्मिती .

‘मुरघास म्हणजे हवा विरहित जागेत किण्वनीकरण (आंबवून) तयार करून साठवलेला चारा होय.’ या पद्धतीमुळे हिरवा चारा त्यातील पौष्टिक घटकांसोबत जास्त काळपर्यंत टिकवून ठेवता येतो.

मुरघासचे फायदे (Benefits Of Murghas)

 • हिरवा चारा त्याच्या गुणधर्मासह टिकविला जातो. वाळलेल्या चाऱ्यापेक्षा साठवणुकीस जागा सुद्धा कमी लागते
 • मुरघासला वाळवण्याची गरज नसल्यामुळे पावसाळ्यात सुद्धा तयार करता येतो.  
 • मुरघास रुचकर, कसदार, चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात तसेच पचायला हलका असतो.
 • एकाच हंगामात जास्तीत जास्त मुरघास (Murghas) तयार करून दुसऱ्या हंगामात जमीन इतर पिकांसाठी वापरता येते.
 • खरीप आणि रब्बी हंगामातील जास्तीचा हिरवा चारा साठवून चारा टंचाईच्या काळात वापरता येतो.
 • पशुखाद्यावरील खर्च कमी होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते.

मुरघास तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके (Crops Uses In Murghas Making)

एकदल पिके – मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके;

द्विदल पिके – लुर्सन, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा

मुरघास तयार करण्यासाठी काय वापरावे?

प्लॅस्टिक बॅग: 5 किलो, 10 किलो, 50 किलो, 100 किलो, 500 किलो, 1000 किलो अशा प्रमाणात मुरघास बॅग उपलब्ध आहेत. या बॅग्स वारंवार वापरात येऊ शकतात. हाताळायलाही सोप्या असतात.

ड्रम सायलेज: प्लॅस्टिक ड्रमची क्षमता 100ते 300 लिटरपर्यंत असते. ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणात मुरघास तयार करावयाचा आहे आणि साखळी पद्धतीने वापरायचा आहे, त्या ठिकाणी ही पद्धत उपयुक्त आहे.

मुरघास तयार करण्याची प्रक्रिया ( Making Process)

 • चारापिके ५० टक्के फुलोऱ्यात असताना कडबाकुट्टी यंत्राने लहान तुकडे करतात.
 • एकदलवर्गीय पिकापासून आणि द्विदल वर्गीय पिकापासून मुरघास (Murghas) बनविताना 4:1 प्रमाण घ्यावे यामुळे रुचकर मुरघास बनतो.
 • एकदलवर्गीय पिकापासून मुरघास बनवितेवेळी एक किलो युरिया 100 लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण चारा कुट्टीवर शिंपडतात. द्विदलवर्गीय पिकापासून मुरघास बनविताना त्यावर गूळ द्रावणाचे मिश्रण शिंपडतात. त्यासाठी एक किलो गूळ 100 लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार केले जाते..
 • कुट्टी तयार करून खड्ड्यात एक फुटापर्यंत थर येईल अशा पद्धतीने भरावे. प्रत्येक थरानंतर वर सांगितलेले द्रावण शिंपडावे.
 • चाराकुट्टीचा थर खड्ड्यात भरताना दाब द्यावा, त्यामुळे चाऱ्यामध्ये हवा राहत नाही. अशा पद्धतीने थरावर थर देत जाऊन खड्डा भरावा. त्यावर वाळलेले गवत किंवा कडबा यांच्या मदतीने आच्छादन करतात.
 • शेण व मातीच्या मिश्रणाने नंतर लिंपून गोलघुमटासारखा आकार द्यावा.
 • साधारण दोन महिन्यांनी चांगला, स्वादिस्ट, रुचकर असा पौष्टिक मुरघास (Murghas) तयार होतो .

जनावरांना किती मुरघास द्यावा? (How Much Murghas Feed to Animals)

 • गाई व म्हशीला 20 ते 25 किलो मुरघास द्यावा. हा चारा दिवसातून 2 ते 3 वेळा द्यावा.
 • शेळी आणि मेंढीला 500 ते 700 ग्राम चारा द्यावा.

दुधाळ जनावरांना मुरघास (Murghas) चारा धारा काढल्यानंतर द्यावा. चारा जर जास्तच आंबट किंवा आम्लयुक्त असेल तर तो थोडा वेळ सुकून द्यावा.

error: Content is protected !!