हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नाशिकसह राज्यातील काही भागांमध्ये द्राक्ष (Nashik Grapes) काढणीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या व्यापाऱ्याला आपली द्राक्ष विक्री करावी, याबाबत मोठी धकधक असते. दरवर्षी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना व्यापारी फसवत असल्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे आता हंगामाच्या सुरुवातीलाच नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ‘बळीराजा हेल्पलाईन’ सुरु करण्यात आली आहे. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास थेट जिल्हा ग्रामीण पोलीस कक्षाकडे या हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष (Nashik Grapes) उत्पादक शेतकऱ्यांकडून जिल्हा ग्रामीण पोलिसांकडे याबाबतच्या घटनांची नोंद वाढली होती. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांकडून हा उपक्रम राबविला जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांची फसवणूक झाल्यास नाशिक ग्रामीण पोलीस शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर असल्याचे उमाप यांनी यावर्षीच्या बळीराजा हेल्पलाईनचे अनावरण करताना म्हटले आहे.
काय आहे ‘बळीराजा हेल्पलाईन’ क्रमांक
- 6262 (76) 6363
157 तक्रारींचे निवारण (Nashik Grapes ‘Baliraja Helpline’)
दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांनी या हेल्पलाइनद्वारे मागील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारींचे निवारण केले असून, यात जवळपास 157 तक्रारींचा निपटारा पोलिसांनी केला आहे. तर साधारण 69 शेतकऱ्यांना 55 लाख 71 हजार 119 रुपये फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी जारी केली आहे. त्यामुळे आता यावर्षीही द्राक्ष हंगाम सुरु होताच पोलिसांनी आपली मोहीम कार्यरत केली असून, यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.