Nashik Grapes : व्यापारी नाही, भावही मिळेना; कांद्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकरीही चिंतेत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्हा द्राक्ष (Nashik Grapes) उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या बांग्लादेशने वाढीव आयात शुल्क लावल्याने, त्या ठिकाणी होणारी द्राक्ष निर्यात जवळपास पूर्णतः ठप्प आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष बागेसाठी व्यापारी मिळणे मुश्किल झाले आहे. सौदा करण्यासाठी व्यापारी द्राक्ष बागेकडे फिरकतही नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे. त्यातच सध्या कांद्याच्या दराप्रमाणेच द्राक्षाचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपली द्राक्ष (Nashik Grapes) उभी करण्यासाठी आणि औषधांवर केलेला खर्चही निघणार नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे.

मिळतोय कवडीमोल दर (Nashik Grapes Farmers Also Worried)

व्यापारीच नसल्याने काही शेतकरी बाजार समित्यांमध्ये आपला घेऊन जात आहे. मात्र, नाशिक बाजार समितीमध्ये सध्या द्राक्षाला (Nashik Grapes) १६ रुपये प्रति किलो इतका निच्चांकी दर मिळत आहे. तर सरासरी २० ते ३० रुपये किलोने शेतकऱ्यांना आपला द्राक्ष बाजार समितीस द्यावा लागत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशने भारतातून येणाऱ्या द्राक्षांवर प्रतिकिलो १०४ रुपये इतके भरमसाठ आयात शुल्क लागू केले आहे. परिणामी, द्राक्ष निर्यात मंदावली असून, काही दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये प्रतिकिलो विकणाऱ्या द्राक्ष दरात निम्म्याहुन अधिक घट झाली आहे.

युरोपातील निर्यातचा खर्च चारपट

तर तिकडे पाश्चिमात्य देशांमध्ये द्राक्ष निर्यात करण्याचा पर्याय उत्पादकांना असतो. मात्र इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धामुळे लाल समुद्रातील माल वाहतूकही बंद आहे. निर्यातदारांना द्राक्ष दक्षिण आफ्रिकी टोकाला वळसा घालून युरोपात पाठवावी लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या द्राक्ष निर्यात खर्चातही चारपटीने वाढ झाली आहे. परिणामी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कांदा उत्पादकांप्रमाणेच कोंडी झाली असून, योग्य दर मिळत नसल्याने उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

दरम्यान, राज्यात एकूण द्राक्ष निर्यातीपैकी ७५ टक्के निर्यात ही नाशिक जिल्ह्यातून होते. प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये मोठ्या द्राक्षाची निर्यात महाराष्ट्रातून होते. तर बांग्लादेश, नेपाळ, भूतान या देशांमध्येही मोठया प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जाते. मात्र यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासून निर्यातीला इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचे ग्रहण लागले. त्यानंतर आता बांग्लादेशात होणारी द्राक्ष निर्यातही प्रभावित झाल्याने, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

error: Content is protected !!