Neem Farming : कडुनिंबाच्या शेतीला व्यावसायिक स्वरूप मिळणार; केंद्र सरकार बनवतंय योजना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या बांधावर कडुनिंबाचे झाड (Neem Farming) अगदी सहज पाहायला मिळते. या कडुनिंबाचे आरोग्य क्षेत्रात अनेक लाभदायी फायदे आहेत. शेती क्षेत्रामध्ये तर कडुनिंबाच्या विविध घटकांचा प्रभावी वापर केला जात आहे. निंबोळी अर्क, निम कोटेड युरिया हे त्यापैकीच काही महत्वाचे घटक आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून कडुनिंबाच्या शेतीला व्यावसायिक शेतीचे स्वरूप दिले जाणार असून, शेतकऱ्यांना देशभरात मोठ्या प्रमाणात कडुनिंबाची शेती (Neem Farming) करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. याबाबत योजना बनवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय, वन मंत्रालय आणि नीती आयोग यांच्यात चर्चा सुरु आहे. असे झांसी येथील कृषी वनीकरण संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. अरुणाचलम यांनी म्हटले आहे.

कडुनिंब शिखर संमेलनाचे आयोजन (Neem Farming Commercialized)

नवी दिल्ली येथे 19 व 20 फेब्रुवारी 2024 रोजी कडुनिंब शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) झांसी येथील केंद्रीय कृषी वनीकरण संशोधन संस्थेच्या माध्यमातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात संस्थेचे संचालक डॉ. ए. अरुणाचलम बोलत होते. यावेळी जागतिक कडुनिंब संघटनेचे अध्यक्ष डॉ. बी.एन व्यास, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक हे देखील उपस्थित होते.

कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा फायदा

देशातील अनेक शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असते. किंवा मग अनेक शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू असते. अशा जमिनीमध्ये शेतकऱ्यांना ही कडुनिंबाची शेती (Neem Farming) करणे खूप फायद्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे सध्या देशाला निम कोटेड युरिया उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कडुनिंबाची आवश्यकता असते. याशिवाय आरोग्य आणि सौंदर्य प्रसाधने या दोन महत्वाच्या क्षेत्रामध्येही कडुनिंबाच्या घटकांची मोठी आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ही कडुनिंब शेतीसाठीची व्यावसायिक योजना राबविली जाणार असल्याचे या संमेलनादरम्यान सांगण्यात आले आहे.

देशात 275 प्रकारची कडुनिंबाची झाडे

सध्यस्थितीत देशात जवळपास 2 कोटी इतकी कडुनिंबाची झाडे आहेत. मात्र, सर्व उद्योगांमधून गरज पाहता पाचपट अधिक अर्थात 10 कोटी कडुनिंबाच्या झाडांची आवश्यकता आहे. सध्या देशात 275 प्रकारचे कडुनिंबाची झाडे आढळतात. ज्यामध्ये 175 प्रकारची झाडे ही उत्तम गुणवत्तेची आहेत. ज्यामुळे केंद्र सरकारकडून देशात शेतकऱ्यांना लागवडीसाठी उत्तम गुणवत्तेची कडुनिंब रोपे उपलब्ध व्हावीत. यावर काम केले जात आहे. उत्तम गुणवत्तेची रोपे मिळाल्यास त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. अशी माहितीही या संमेलनादरम्यान समोर आली आहे.

error: Content is protected !!