Nematodes: पि‍कातील सुत्रकृमींचा असा ओळखा प्रादुर्भाव! जाणून घ्या एकात्मिक नियंत्रण उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या पिकांवर सूत्रकृमीचा (Nematodes) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. या रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसून येत नसल्यामुळे उपाय योजना करायला उशीर होतो व त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही पिकांच्या उत्पादनात (Crop Production) सूत्रकृमींमुळे 12 ते 13 टक्के घट होते. जाणून घेऊ या सुत्रकृमी (Nematodes) रोगाची सुरुवातीची लक्षणे व त्यावर करायचे एकात्मिक नियंत्रण उपाय.

प्रसाराची कारणे (Causes Of Nematodes Spread)

  • प्रादुर्भावग्रस्त जमिनीत वापरली जाणारी शेती अवजारे, चप्पल व बूट यासोबत येणाऱ्या मातीमधून सूत्रकृमीचा प्रसार होऊ शकतो.
  • प्रादुर्भावग्रस्त रोपे, बेणे यांचेमार्फत
  • प्रादुर्भावग्रस्त जमिनीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे सूत्रकृमी शेतात येऊ शकतात
  • पक्षी किंवा कीटका मार्फतही या रोगाचा प्रसार होतो

सुत्रकृमीच्या गाठी कशा ओळखायच्या? (Root Knot Nematodes)

सुत्रकृमीमुळे (Nematodes) झालेल्या गाठी ओळखणे अवघड असते. सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या मुळावर वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार सूज येऊन गाठी तयार होतात. डाळवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठी आणि सूत्रकृमींच्या गाठी यामध्ये गोंधळ होऊ शकतो, मात्र त्यामधील फरक लक्षात घ्यावा.

डाळवर्गीय पिके उदा. हरभरा, मूग, मटकी, उडीद, तूर किंवा तेलबिया पिके उदा. सोयाबीन, भुईमुग यांच्या मुळावर असलेल्या गाठी सहजासहजी वेगळ्या होतात. त्या पूर्णपणे गोलाकार आणि काही प्रमाणात लालसर असतात. या गाठी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंमुळे तयार होतात.

सूत्रकृमीच्या (Nematodes) प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या गाठी सहजासहजी वेगळ्या होत नाहीत. या गाठी म्हणजे मुळाचीच जादा झालेली बाह्य वाढ असते. या गाठींचा रंग मुळाप्रमाणेच असतो.

पिकांवर सूत्रकृमीचा प्रादुर्भावाची लक्षणे (Symptoms Of Nematodes Infestation)

  • पिकांच्या मुळ्या वेड्यावाकड्या होतात.
  • पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मुळांची व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते.
  • पाने पिवळी पडलेली दिसतात.
  • जमिनीमध्ये पाण्याचा अंश पुरेसा असतानाही पीक सुकल्यासारखे दिसते किंवा झाड संपूर्ण सुकते.
  • भाजीपाला पिकात सुत्रकृमीच्या गाठींना तडे जाऊन त्या उघड्या पडतात.
  • फुले, फळे कमी लागतात. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत असे पीक मरून जाते.
  • मोठ्या झाडामध्ये सूत्रकृमींचा (Nematodes) प्रादुर्भाव होऊन झाडाझुडपांची वाढ मंदावते.

सूत्रकृमी नियंत्रणाचे एकात्मिक उपाय (Integrated Management Of Nematodes)

  • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलवर नांगरट करावी.
  • पिकांची फेरपालट करावी.
  • पि‍कामध्ये झेंडूची (Marigold Intercropping) लागवड हा सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी उत्तम उपाय आहे.
  • मिश्र पिकांची (Mixed Cropping) लागवड करावी.
  • धैंचा, ताग यासोबतच मूग, उडीद, चवळी या सारखी द्विदल वर्गीय किंवा हिरवळीची पिके (Green Manure) घ्यावीत.
  • सेंद्रिय खते उदा. निंबोळी किंवा एरंड पेंड 1.5 ते 2 टन प्रति हेक्टर या प्रमाणात 15 दिवस अगोदर वापर करून पाणी द्यावे.
  • सूत्रकृमींचा (Nematodes) प्रादुर्भाव नसलेल्या किंवा प्रतिकारक रोपांचा वापर करावा.
  • पॅसिलोमायसिस लिलियानस ही मित्र बुरशी सूत्रकृमींची नैसर्गिक शत्रू आहे. पॅसिलोमायसिस लिलियानस प्रमाणेच स्युडोमोनस फ्ल्यूरोसन्स किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी यांची 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
  • जमिनीत शेणखतातून पॅसिलोमायसिस लिलियानस, स्युडोमोनस फ्ल्यूरोसन्स किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी (Trichoderma viridi) या पैकी एक 5 ते 10 किलो प्रमाणात 100 किलो संपूर्ण कुजलेल्या, ओलसर शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी जमिनीत किंवा फळझाडांना खोडालगत मातीत मिसळून हलके पाणी द्यावे.
  • फ्लुयोपायरम (34.48 % एससी) 250 ते 300 मि.लि. प्रति एकर या प्रमाणात आळवणीद्वारे द्यावे. किंवा ॲबामेक्टीन (1.8 ईसी) 40 मि.लि. प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून जमिनीमधून द्यावे.
error: Content is protected !!