हॅलो कृषी ऑनलाईन : ‘कारळा’ तिळाचे तेलबिया पीक (Niger New Species) हे कोकणातील महत्वाचे पारंपरिक पीक असून, त्यात जवळपास 35 ते 40 टक्के तेल असते. तिळाच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण व सौंदर्य प्रसाधने यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. यामुळे त्याला विशेष मागणी असते. मात्र आता कोकण कृषी विद्यापीठाने ‘कारळा’ तिळावर संशोधन करत, त्याची नवीन जात विकसित (Niger New Species) केली आहे. लवकरच या जातीचे नाव निर्धारित करत, ती येत्या हंगामात शेतकऱ्यांना लागवडीसाठी विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्रामध्ये हे ‘कारळा’ तिळावरील संशोधन करण्यात आले आहे. पारंपरिक तिळाच्या जातीपासून मिळणारे उत्पादन कमी असते. ज्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये तीळ हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांकडून तिळाचे अधिक उत्पादन देणारे नवीन वाण विकसित करण्याची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांच्या याच मागणीला अनुसरून 2014-15 पासून विद्यापीठाकडून हे नवीन वाण विकसित करण्याचे काम सुरु होते. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर या नवीन वाणाची चाचणी सुरू असून, या वाणामुळे शेतकऱ्यांना फळबागांमध्ये आंतरपीक घेण्यासह, तिळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येणार आहे.
‘कारळा’ तिळाच्या नवीन वाणाची वैशिष्ट्ये (Niger New Species Developed)
- ऑगस्ट महिन्यात लागवड केल्यास तीन महिन्यात पीक काढणीला येते.
- 35 ते 40 दिवसात फुलोरा येऊन 90 दिवसात पीक तयार होते.
- या वाणापासून हेक्टरी 450 ते 500 किलो उत्पादन मिळणार आहे.
- पडीक, माळरान, पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेतही या वाणाचे तीळ पीक उत्तम येते.
- या वाणाच्या तिळात तेलाचे प्रमाण 42 टक्के इतके आहे.
- कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याने, या वाणाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सरकारी अनुदान मिळणार आहे.
- या तिळाच्या वाणाला वन्य प्राण्यांचा कोणताही त्रास होत नाही.
- नाशिक सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील तिळाच्या जाती एकत्र करून हे नवीन वाण विकसित करण्यात आले आहे.
- या वाणाला पाणी अत्यंत कमी लागते.