Nili Ravi Buffalo: पंचकल्याणी ‘निली रावी’ म्हैस; जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: तुमच्यापैकी बहुतेक जणांना प्रश्न पडला असेल की निली आणि रावी (Nili Ravi Buffalo) या म्हशीच्या दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत का? तर हे खरं आहे. सुरुवातीला निली आणि रावी अशा दोन वेगवेगळ्या म्हशींच्या जाती होत्या. परंतु या दोन्ही जातीच्या म्हशीचं दिसणे आणि उत्पादनामध्ये जवळपास समानता आहेत. त्यामुळे त्यांच्यातील वेगळेपणा ठरवणे अवघड असल्यामुळे या म्हशींना निली रावी (Nili Ravi Buffalo) या नावाने एकच जात म्हणून मान्यता मिळाली.

या म्हशींचा उगम (Nili Ravi Buffalo Origin) पंजाबमधील फिरोजपुर, अमृतसर, गुरुदासपूर जिल्ह्यांमध्ये झाला आहे. दूध उत्पादनासाठी विशेषतः या जातींचा वापर केला जातो.

शरीर रचना (Nili Ravi Buffalo Characteristics)

ही म्हैस मुऱ्हा जातीप्रमाणे मोठ्या आकाराची आहे. लांब तोंड, फुगीर कपाळ, विस्तारलेल्या नाकपुड्या, मुऱ्हा म्हशी सारखी वळलेली शिंग, लांब मान असते डोळे हे घारे असतात. शरीरावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी पांढरे ठिपके. उदा. कपाळ, तोंड, नाकपुड्या. चारी पायांना सॉक्स घातल्यासारखा पांढरा रंग आढळतो. शेपटीचा गोंडा पांढरा. शरीरावरील पाच ठिकाणच्या पांढर्‍या ठिपक्यामुळे या जातीला पंचकल्याणी असेही म्हणतात. नवजात रेडकाचं वजन 35  ते 40 किलो आणि प्रौढ म्हशीचं वजन 450 ते 550 किलो असते.

उत्पादकता (Milk Production)

या म्हशीचे प्रथम माजावर येण्याचे वय अंदाजे 36 महिने आहे. एका वेतात दूध देण्याचा कालावधी 277 ते 355 दिवस असून 1500 ते 2000 लिटर प्रति वेत दूध देते. दररोज साधारण 6 ते 9 लिटर दूध देते.

विशेष माहिती

या म्हशीचा एकूण जीवन काळ 12 ते 15 वर्षे एवढा असतो. केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हिसार, हरियाना येथे निली रावी म्हशीचं संवर्धन आणि संशोधन होते. पंजाबमध्ये नाभा या ठिकाणी संस्थेची उपशाखा आहे. 

फिलीपिन्स, इटली, हंगेरी, रोमानिया, ग्रीस, ब्राझील, बल्गेरिया देशांमध्ये त्यांच्या स्थानिक म्हशींच्या जाती सुधारणा कार्यक्रमामध्ये निली रावी (Nili Ravi Buffalo) जातीचा उपयोग केला जातो.

error: Content is protected !!