मदतीपासून एकही शेतकरी वंचित नसेल : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. मात्र पुणे दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभिर्याने पावले टाकली जात आहेत. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल सरकार घेईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘विरोधी पक्ष या मुद्द्यावर काही बोलत असल्यास बोलू द्या. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याकरिता आम्ही काळजी घेत आहोत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील शेतकरीपुत्र आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळेच साडेचार हजार कोटींची मदत आतापर्यंत राज्यभर केली गेली. अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती घेण्यासाठी पंचनामे सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतवाटपाची प्रक्रिया सुरू होईल,’’ असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नुकसान भरपाई वाटप नियोजनाविषयी ते म्हणाले, ‘‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कामकाजाबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी चर्चा केलेली आहे. नुकसानग्रस्त भागांना मी स्वतःही भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. अतिपावसामुळे हानी झालेल्या भागांची माहिती मुख्यमंत्रीही घेत होते. त्यांनी निराश झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केलेले आहे. चांगली मदत देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.’’

 

error: Content is protected !!