Okra Farming : उन्हाळी भेंडी लागवड; लग्न समारंभांमुळे असते मोठी मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी सध्या उन्हाळी भाजीपाला पिके (Okra Farming) घेण्याबाबत नियोजन करत आहे. लग्नसराईचा सिझन सुरू असल्याने, भाजीपाल्याला विशेषतः भेंडीला मोठी मागणी असते. भेंडी हे पिक खरिप व रब्बी दोन्ही हंगामात घेता येत असल्यामुळे, वर्षभर भेंडीची लागवड केली जाते. याशिवाय तिला नेहमीच बाजारात मागणी असते. आता तुम्हीही एखादे उन्हाळी भाजीपाला पीक घेण्याचा विचार करत असाल तर भेंडी लागवड (Okra Farming) तुमच्यासाठी चांगला पर्याय असणार आहे.

जमीन व खते (Okra Farming Summer Planting)

भेंडीसाठी मध्यम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त ठरते. जमिनीचा सामू 6 ते 6.8 पर्यंत व क्षारता 0.20 पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत भेंडी लागवड करावी. हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा. याशिवाय एकरी 90 किलो युरिया, 50 किलो डीएपी, 30 किलो एमओपी खते वापरावे. यातील काही अर्धा (45 किलो) युरिया, संपूर्ण डीएपी आणि एमओपी जमीन तयार करतानाच वापरावे. उर्वरित 45 किलो युरिया हा भेंडीला पीक जोमात असताना टाकावा. उन्हाळी हंगामासाठीची भेंडीची लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान पूर्ण करावी.

प्रमुख जाती

अंकुर 40, पुसा सावनी, महिको 10, परभणी क्रांती, वर्षा, अर्का अनामिका, सिलेक्शन 2-2, फुले उत्कर्षा या भेंडीच्या सुधारित जाती आहेत. ज्यांची निवड करून तुम्ही भरघोस उत्पादन मिळवू शकतात. उन्हाळी लागवडीसाठी सुमारे 10-12 किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी 12 तास भेंडीचे बियाणे पाण्यात भिजवून घेतल्यास त्याची उगवणक्षमता चांगली असते. तसेच लागवडीपूर्वी बियाण्याला 3 ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाजिम प्रति किलो बियाण्याच्या प्रमाणात चोळून घ्यावे.

कशी करावी लागवड?

भेंडीची लागवड (Okra Farming) ही सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर करतात. उन्हाळी हंगामासाठी 45 बाय 15 किंवा 60 बाय 20 सेमी अंतरावर लागवड करावी. मजुरांची अडचण असल्यास पाभरीने पेरणी करतात व ते उतरल्यावर ठराविक अंतर राखून विरळणी करावी. जमिनीच्या प्रकाराप्रमाणे व हवामानानुसार 5-8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दोन ओळीत सुके गवताचे आच्छादन करावे. ठिबक पद्धतीचा वापर करून, बेड पद्धतीने लागवड केल्यास पाण्याची 80 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. याशिवाय ठिबकच्या मदतीने भेंडीला सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील दिली जाऊ शकतात.

काढणी व उत्पादन

भेंडी लागवडीनंतर (Okra Farming) साधारणपणे 35-45 दिवसात फुले येतात. त्यानंतर 5-6 दिवसात फळे तोडणी योग्य होतात. कोवळ्या फळाची काढणी तोडा सुरु झाल्यास 2-3 दिवसाच्या अंतराने तोडणी करावी. तोडणीसाठी म. फु.कृ. विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या भेंडी हार्वेस्टचा वापर करावा. निर्यातीसाठी 5-7 सेमी लांब कोवळी एकसारखी फळाची तोडणी करावी. काढणी सकाळी लवकर करावी. काढणीनंतर शीतकरण शक्य असल्यास करावे, किंवा वेळेत बाजारात विक्रीसाठी न्यावी. उन्हाळी हंगामात भेंडीपासून हेक्टरी 6-7 टनापर्यंत उत्पादन मिळते.

एकाच जमिनीत वारंवार भेंडीचे पीक घेऊ नये. भेंडीचे पीक घेण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाचे अवशेष समूळ नष्ट करावेत. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत रासायनिक नत्र खताचा वापर कमी करून पोषण संतुलन करावे. एखाद्या कीडीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या कीटकनाशकाचा कमीतकमी वापर करावा. शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी शेंडे काढून जाळावीत. गंध सापळे व प्रकाश सापळे यांचा वापर करावा. अंडी नियंत्रणासाठी क्युराक्रोनची फवारणी करावी. मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा. या सर्व बाबींची काळजी घेऊन तुम्ही कमी कालावधीत भेंडी लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

error: Content is protected !!