Onion Export Ban : ‘व्यापाऱ्यांना तारा, शेतकऱ्यांना मारा’ हेच सरकारचे धोरण – जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) मागे न घेण्याच्या निर्णयामुळे राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवण्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारचे धोरण हे व्यापाऱ्यांच्या फायद्याचे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मारक असल्याचे म्हटले आहे. ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत कांदा निर्यातबंदीवरून (Onion Export Ban) त्यांनी केंद्र सरकार टीका केली आहे.

काय म्हटलंय जयंत पाटील यांनी? (Jayant Patil Criticism On Onion Export Ban)

कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. मात्र, सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) उठवलीच गेली नाही. राज्यात चालू रब्बी हंगामात चार लाख 32 हजार 798 हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगाम अखेर सुमारे 86 लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ शकते. त्यामुळे ‘व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा’ असे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हमीभाव देण्याची भूमिका नाही – पवार

तर राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील आज एका कार्यक्रमात ‘देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देण्याची केंद्र सरकारची भूमिका नाही.’ असे म्हटले आहे. कांदा निर्यात बंदी हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात निर्यात बंदी हटवलीच नाही. इतकेच नाही तर नवी दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी हमीभाव कायदयाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार या शेतकऱ्यांवर अमानुषपणे अत्याचार करत असून, सरकारची भूमिका शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची नसल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षाकडून चौफेर टीका

राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील कांदा निर्यातबंदीबाबत केंद्र सरकारवर मंगळवारी (ता.20) टीका केली होती. सरकार केवळ 3.50 लाख टन निर्यातीस मंजुरी देत असेल तर उर्वरित कांदा अमित शाह यांच्या घरी पाठवायचा का? अशा कठोर शब्दात त्यांनी टीका केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील केंद्र सरकारने अंशतः हटवलेल्या निर्यातबंदीचा फायदा हा केवळ मोठ्या व्यापाऱ्यांनाच होणार असून, त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याचे म्हटले आहे.

error: Content is protected !!