हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राप्रमाणेच आता गुजरातमध्येही कांदा निर्यात बंदीवरून (Onion Export Ban) शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुजरातमधील सौराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. मात्र केंद्र सरकारने निर्यात बंदीनंतर (Onion Export Ban) केल्यानंतर महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही कांदा दर घसरले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज सौराष्ट्र भागातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या गोंडल बाजार समितीसमोर कांदा निर्यात बंदीचा निषेध केला. तसेच राष्ट्रीय महामार्गावर कांदे फेकून रास्ता रोको आंदोलन केले आहे.
दरात मोठी घसरण (Onion Export Ban Farmers Aggressive In Gujarat)
कांदा निर्यातबंदीच्या घोषणेअगोदर गुजरातमध्ये कांद्याला प्रति 20 किलोसाठी 400 ते 600 रुपये दर मिळत होता. मात्र निर्यात बंदीची (Onion Export Ban) घोषणा होताच त्या ठिकाणी कांदा दर 200 ते 300 रुपयांपर्यंत (प्रति 20 किलोसाठी) खाली घसरले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात गुजरातमधील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत आंदोलनाचे नेतृत्व करणारे काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष पाल अंबालिया यांनी केंद्र सरकारविरोधात आरोप करताना म्हटले आहे की, “केंद्र सरकारकडून नेहमीच शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. थोडा दर मिळू लागताच सरकार मध्यस्थी करून दर पाडते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.”
तीन खासदारांनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट
गुजरातमधील शेतकऱ्यांनी आक्रमक होत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर आता गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या मोहन कुंडारिया, रमेश धडुक आणि राजेश चूड़ासमा या तीन खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी कृषी मंत्र्यांकडे कांद्याची सरकारी खरेदी करण्याची मागणी केली आहे. मात्र यावर अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. ज्याप्रमाणे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्यामुळे सरकारकडून याबाबत काही ठोस निर्णय होणार की नाही? याकडेच गुजरातमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.