Onion Export : कांदा निर्यातबंदी हटवली जाण्याची शक्यता; दर घसरणीमुळे सरकारचा विचार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांदा निर्यात (Onion Export) बंदीची घोषणा केली होती. देशातील कांदा उत्पादनात घट झाल्याने आणि मागील तीन महिन्यांपासून कांद्याचे दर दुपटीने वाढल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता देशातंर्गत बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने, केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यातबंदी हटवली जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export) हटवण्यासंदर्भात केंद्र सरकारची बैठक होणार असल्याचे अधिकृतरित्या सांगितले जात आहे. त्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील दहा दिवसांमध्ये खरीप कांद्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज जवळपास 15000 क्विंटल कांद्याची आवक होत आहे. या वाढलेल्या आवकेमुळे कांद्याचे दर सरासरी 1,870 रुपये प्रति क्विंटलवरून घसरून, सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. कांद्याच्या दरात सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आल्यानंतर कांद्याच्या दरात जवळपास 35 टक्क्यांनी घसरण झाल्याचे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे. त्यामुळे आता चालू आठवड्यात केंद्र सरकारकडून याबाबत बैठक घेत, निर्यातबंदी हटवण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्यातबंदी हटवल्यानंतर सरकारकडून प्रामुख्याने सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी दिली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारी खरेदी सुरूच राहणार (Onion Export Ban Likely To Be Lifted)

कांदा दरात घसरण झालेली असली तरीही देशातंर्गत बाजारात केंद्र सरकारकडून सुरु असलेली किरकोळ कांदा विक्री सुरूच राहणार आहे. याशिवाय नाफेड, एसीसीएफ या सहकारी संस्थांकडून सुरु असलेली सरकारी कांदा खरेदी देखील नियमित सुरु राहणार आहे. राखीव साठ्यामध्ये असलेल्या 5 लाख टन कांद्यापैकी केंद्र सरकारने सध्या 3.04 लाख टन कांदा हा नाफेड आणि एनसीसीएफ या सहकारी संस्थांच्या माध्यमातून बाजारात उतरवलेला आहे. त्यामुळे देशातंर्गत बाजारात कांद्याच्या दारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारचा कांदा दरातील हस्तक्षेप

  • यावर्षी 17 ऑगस्ट रोजी कांदा दरवाढ होत असल्याचे दिसताच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export) 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले.
  • मात्र कांदा दर कमी होत नसल्याचे पाहताच केंद्र सरकारने 28 ऑक्टोबर रोजी कांदा निर्यातीवर 800 डॉलर प्रति टन इतके मोठ्या प्रमाणात निर्यात मूल्य लागू केले जेणेकरून देशातून कांदा बाहेर जाऊ नये. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात कांदा निर्यात 85 टक्क्यांपर्यंत घटली.
  • मात्र, तरीही कांदा दर नियंत्रणात येत नसल्याचे पाहून केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी पूर्णतः कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. परिणामी कांदा दर सध्या सरासरी 1500 रुपयांपर्यंत घसरले आहेत.
error: Content is protected !!