हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यात 12 जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहे. कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) मुद्दा चर्चेत असताना त्यांचा हा नाशिक दौरा विशेष ठरणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यातबंदीच्या घोषणेनंतर मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांनी मोदी नाशिक येणार असतील, तेव्हा जाहीर नाराजी व्यक्त करावी, असे स्वतंत्र भारत पक्षाचे (Onion Export Ban) राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहे. त्यामुळे आतापासूनच सोशल माध्यमांवर कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) उठविण्याची मागणी करावी. त्यासाठीची माहिती व्हायरल करून, राज्यातील भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत निर्यातबंदी उठवण्याच्या मागणी घोषणा पोहचली पाहिजे. केंद्र सरकारने निर्यातबंदी न उठल्यास पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावेळी ‘मोदी गो बॅक’, ‘मोदी चले जाव’ अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींचा निषेध करावा, असेही अनिल घनवट यांनी म्हटले आहे.
‘अच्छे दिन’चे आश्वासन (Onion Export Ban PM Modi in Nashik)
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींनी नाशिक येथे एक जाहीर सभा घेतली होती. या जाहीर सभेत त्यांनी कांदा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सरकारकडून मागील सहा महिन्यात अनेक वेळा कांदा दर पाडण्यासाठी प्रयत्न झाले. आता सरकारने पूर्णपणे निर्यात बंदी करत शेतकऱ्यांच्या घात केला आहे. दिलेले आश्वासन ते विसरले असून, निर्यात बंदी करून नाशिकला येण्याची हिंमत दाखवत आहे. असेही अनिल घनवट यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी निषेध करावा
दरम्यान सध्या देशात शेतीमालाचे दर घसरले असून, त्यातच सरकारने कांदा निर्यात बंदीची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सरकारने कांदा दर पाडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले असून, अनेक वेळा निर्यातबंदी, कांदा साठ्यावर मर्यादा, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य, कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे दर पाडले आहेत. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी कंगाल, कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदीचा निषेध करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.