हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय लागू केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समित्या बेमुदत बंद ठेवल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्येही संतापाचे वातावरण असून, ठिकठिकाणी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Export Ban) मैदानात उतरले आहे. सोमवारी (ता.11) चांदवड येथे होणाऱ्या कांदा उत्पादकांच्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत.
शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन (Onion Export Ban Sharad Pawar)
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात सोमवारी 11 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला पवार उपस्थित राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे हे आंदोलन होणार आहे. दरम्यान आजही जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा मोठा रोष पाहायला मिळाला. विंचूर आणि पिंपळगाव बसवंत बाजार समिती वगळता जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद होत्या. या दोन्ही बाजार समित्यांमध्येही सकाळच्या सत्रात लिलाव सुरु असताना शेतकऱ्यांच्या रोषामुळे ते बंद करण्याची वेळ बाजार समिती प्रशासनावर आली.
आजचे कांदा बाजारभाव
नाशिक जिल्ह्यातील विंचूर बाजार समितीत आज सकाळच्या सत्रात कांद्याला कमाल 3000 रुपये ते किमान 1000 रुपये तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कमाल 3225 रुपये ते किमान 1200 रुपये तर सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. दरम्यान आज मराठवाड्यातील बीड तर अहमदनगर येथील बाजार समितीतही कांदा दरात मोठी घसरण झाली आहे.