हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export) लागू केल्यामुळे, या निर्णयाचे पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेले कांदा उत्पादक शेतकरी ठीकठिकाणी आंदोलन करत असून, व्यापाऱ्यांनीही आंदोलनाला पाठींबा दर्शवत बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच आता येत्या दोन दिवसांमध्ये कांदा निर्यातीबाबत (Onion Export) निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याची निर्यात (Onion Export) पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, कांद्याचे दर घसरले आहेत. याबाबत बोलताना कृषिमंत्री मुंडे म्हणाले की, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करत असून, दोन दिवसांमध्ये यावर शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना याप्रश्नी लवकरच दिलासा दिला जाईल. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे आता सरकारकडून याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्व कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नुकसानीबाबत लवकरच निर्णय (Onion Export Dhananjay Munde)
दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा दिलासा देण्यासाठी सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हितकारक निर्णय लवकरच घेतला जाईल. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यांना पुढील आठ दिवसांमध्ये ती रक्कम दिली जाईल. असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे. तर पीक काढणीनंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना देखील तात्काळ पिक विमा देण्याचा आदेश लवकरच पिक विमा कंपन्यांना दिला जाईल, असेही मुंडे यावेळी म्हणाले आहे.