हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कांदा दराबाबत (Onion Harvester) मोठी चर्चा होत आहे. मात्र हाच कांदा बाजारात जाईपर्यंत शेतकऱ्यांना त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. अगदी रोपे तयार करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत सर्व कामे शेतकऱ्यांना मजुरांमार्फत करावी लागतात. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी भारतातील पहिले कृषी विद्यापीठ असलेल्या गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने कांदा काढणीचे एक यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना कांदा काढणीसह (Onion Harvester) त्याच्या मुळ्या आणि पात त्यापासून वेगळ्या करता येणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा मजुरी खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार (Onion Harvester For Farmers)
गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ हे देशातील पहिले कृषी विद्यापीठ असून, ते उत्तराखंडमध्ये स्थित आहे. विद्यापीठाच्या कृषि मशिनरी विभागाचे प्रमुख डॉ. आरएन पटारिया यांनी म्हटले आहे की, उत्तराखंडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. मात्र विद्यापीठाने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांतील शेतकऱ्यांचे काढणीसाठीचे मजुरीवरील कष्ट पाहून हे कांदा काढणी यंत्र (Onion Harvester) बनवले आहे. २०२० मध्येच विद्यापीठाकडून हे यंत्र बनवण्यात आले असून, त्यास लवकरच पेटंट मिळणार आहे. पेटंटची प्रक्रिया पूर्ण होताच ते देशभरातील शेतकऱ्यासांठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. असेही डॉ. आर एन पटारिया यांनी म्हटले आहे.
कसे करते मशीन काम?
विद्यापीठाने बनवलेले हे कांदा काढणी यंत्र शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टरला जोडावे लागणार आहे. या मशीनला 15 ते 25 एचपीचा ट्रॅक्टर असणे आवश्यक असतो. ही मशीन शेतातील मातीतून कांदा काढते. याशिवाय त्याची पात आणि मुळ्या बाजूला करते. देशातील हे पहिलेच कांदा काढणी यंत्र असून ते लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा काढणीवरील मजुरीचा खर्च कमी होणार आहे. प्रति एकर कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांना १५ ते २० मजुरांची गरज भासते. मात्र, या यंत्रामुळे शेतकऱ्यांना मजुरांची गरज भासणार नाही, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या मनातील शंका?
आता बहुतेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की, या मशीनमुळे कांदा काढताना नासाडी होत असेल. कांद्याची फूटतूट होत असेल. मात्र याबाबतही विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या यंत्राद्वारे पूर्णतः सुरक्षित कांदा काढणी होते. याशिवाय अनेक शेतकऱ्यांना वाटेल की कांदा काढणी यंत्राचा वापर करण्यासाठी विशिष्ट अंतरावर कांदा लागवड करावी लागेल तर यात निश्चितच तथ्य आहे. विद्यापीठाने म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कांदा काढणीसाठी या मशीनचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट पद्धतीने कांदा लागवड करावी लागणार आहे. ज्यामुळे कांदा पिकाचे नुकसान होणार नाही.