हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कांद्याचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. या पिकाचे उत्पादन घेतल्याने राज्यात आणि देशातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकरी या बदल्यात कांदा पिकासाठी अनुदानाची मागणी करत आहेत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ या वर्षात प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान राज्य शासनानं जाहीर केलं. यासाठी अर्ज करण्याची मुदतवाढ ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे.
२०२२ – २३ या वर्षात विक्री केलेल्या कांद्याला ३५० रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. यासाठी ३ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत होती. मात्र काही शेतकऱ्यांना या दरम्यान अर्ज करता आले नाही. यामुळे या अर्जाची मुदत ही ३० एप्रिल करण्यात आली. ज्या ठिकाणी कांदा विक्री केला, त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांच्याकडे अर्ज वेळेत सादर करावेत. यावर आता पुन्हा मुदतवाढ भेटणार नसल्याचं म्हटलं जातंय.
कृषी उत्पन्न बाजारसमितीत, खासगी बाजारात किंवा नाफेडमध्ये १ ते ३१ मार्चपर्यंत विकलेल्या कांद्याला अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची मर्यादा २०० क्विंटल पर्यंत आहे. यासाठी प्रतिक्विंटल हे ३५० रुपये इतकं अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज भरून द्यावा लागणार असून अर्जासाठी कागदपत्रांची देखील आवश्यकता आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
१) कृषी बाजार समिती, खासगी बाजार, पणन परवानाधारक नाफेड, जिल्हा उपनिबंधक, तालुका निबंधक आणि सहकारी संस्था या ठिकाणी हा अर्ज उपलब्ध आहे.
२) बँक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स
३) कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा
४) कांदा विक्रीची मूळ पट्टी आणि जर ही विक्री पट्टी इतर कोणाच्या नावे असेल तर मूळ मालकाचं शपथपत्र इत्यादी, कागदपत्रांची आवश्यकता आहे.