हॅलो कृषी ऑनलाईन : हवामानातील बदल आणि दरातील चढ-उतार यामुळे कांदा (Onion Powder Project) उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशा पडते. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प राबविला जाणार आहे. हा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक (Onion Powder Project) शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
राज्यातील आघाडीचा कांदा उत्पादक जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्याचे माजी विधान परिषद सदस्य जयंत जाधव यांच्याकडून कृषिमंत्री मुंडे यांच्याकडे भुकटी प्रकल्पाच्या (Onion Powder Project) उभारणीसाठी मागणी करण्यात आली होती. त्यास मान्यता देण्यात आली आहे. हा भुकटी प्रकल्प जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळे त्यासाठी राज्य सरकारच्या स्मार्ट योजनेतून 60 टक्क्यांऐवजी 90 टक्के अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहितीही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
द्राक्षासाठी फूड टेस्टिंग लॅब (Onion Powder Project In Maharashtra)
नाशिक हा कांद्यासह द्राक्ष पिकासाठी ओळखला जाणार जिल्हा आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होते. मात्र जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्ष पिकाचे उत्पादन घेण्यात अडचण निर्माण होते. यासाठी जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभारण्यासाठी देखील स्मार्ट योजनेतून अनुदान देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या बैठकीला स्मार्ट प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, कृषी संचालक सुभाष नागरे, सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, कृषी संचालक दशरथ तांबडे हे उपस्थित होते.