Onion Production : ‘ही’ आहेत पाच प्रमुख कांदा उत्पादक राज्य? होते ८० टक्के उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे (Onion Production) मोठे नुकसान झाले आहे. आधीच पावसाअभावी उत्पादनात घट होणार, त्यात अवकाळीची भर पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की, महाराष्ट्राशिवाय कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक कांदा पिकतो? (Onion Production) तर या प्रश्नाची उकल करण्यासाठी घेतलेला हा थोडक्यात आढावा…

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात 26 राज्यांत कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जात असून, त्याद्वारे सुमारे 300 लाख टनांपर्यंत कांदा उत्पादित होतो. यापैकी 40 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो. आणि राज्यातील एकूण उत्पादनापैकी 37 टक्के कांदा उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. त्या खालोखाल मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. मध्यप्रदेशात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतात. देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी एमपीमध्ये 15.23 टक्के कांदा उत्पादित होतो. महाराष्ट्राप्रमाणेच एमपीमधील वातावरण कांदा पिकाला पोषक मानले जाते. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून, त्या ठिकाणी 8.93 टक्के कांदा उत्पादन होते. चौथा क्रमांक गुजरात राज्याचा असून, त्याठिकाणी देशातील एकूण उत्पादनापैकी 8.21 टक्के कांदा उत्पादन होते. तर पाचव्या क्रमांकावर राजस्थान असून, त्या ठिकाणी 4.65 टक्के कांदा उत्पादन होते.

दर घसरणीचे संकेत नाही! (Onion Production In India)

दरम्यान, वरील प्रमुख पाच राज्यांमध्ये देशातील 80 टक्के कांदा उत्पादित होतो. मात्र सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने आवक कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता कांद्याचे आगार असलेल्या महाराष्ट्रात गारपिटीचा तडाखा बसला आहे. तर मागील आठवड्यात गुजरात आणि राजस्थानमध्येही पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप कांद्याच्या दर घसरणीचे सध्या तरी कोणतेही संकेत नाही. मात्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकमधून नववर्षात काही प्रमाणात रब्बी कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्यानंतर दरात अल्प घसरण होऊ शकते. असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!