हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात (Onion Purchase) निम्म्याने घट झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीनंतर कांदा सरासरी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (एनसीसीएफ) आणि ‘नाफेड’च्या माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अशी माहिती ‘एनसीसीएफ’च्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली आहे. त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये अधिकृतरित्या सरकारी कांदा खरेदी (Onion Purchase) सुरु करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
सर्वाधिक खरेदी नाशिकमधून (Onion Purchase Two Lakh Tons From State)
राज्यात खरेदी केल्या जाणाऱ्या एकूण कांद्यापैकी ६५ ते ७० टक्के हा कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी (Onion Purchase) करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. नाशिकमध्ये नाफेड आणि ‘एनसीसीएफ’कडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार आहे अशी माहितीही चंद्रा यांनी यावेळी दिली आहे. शेतकऱ्यांकडून हा कांदा केंद्र सरकार २६२३.७० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
9 डिसेंबरपासून खरेदी सुरु
‘एनसीसीएफ’ आणि नाफेडमार्फत चालू आर्थिक वर्षात अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. त्यानुसार यावर्षी आतापर्यंत २ लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केला करण्यात आला आहे. हा कांदा दोन टप्प्यात खरेदी केला असून, यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात १ लाख ५० हजार ०१८ मेट्रिक तर दुसऱ्या टप्प्यात १ लाख ३७ हजार ७१४ मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील कांदा खरेदी ९ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली असून, गेल्या आठवडाभरात २ हजार ११६ मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. अशी माहितीही चंद्रा यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आहे की, “एनसीसीएफ’च्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचे पीठ, डाळीं पाठोपाठ ‘एनसीसीएफ’तर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात विक्री केली जाणार आहे.”