Onion Rate : कांद्याला एक रुपया भाव; शेतकऱ्याने खिशातून घातले 565 रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यात बंदीमुळे झालेल्या कांदा दर (Onion Rate) घसरणीनंतर शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली असून, आता त्यांना उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावातील एका शेतकऱ्याने साडे चार क्विंटल (443 किलो) कांदा सोलापूर बाजार समितीत नेला असता, या शेतकऱ्याला 565 रुपये खिशातून द्यावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता या घटनेनंतर कांदा (Onion Rate) उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील कांदा (Onion Rate) उत्पादक शेतकरी श्रीराम शिंदे यांचा मुलगा वैभव शिंदे मागील आठवड्यात सोलापूर बाजार समितीत आपला साडे चार क्विंटल (443 किलो) कांदा विक्रीस घेऊन गेला होता. यामध्ये त्यांचा 345 किलो गोल्टी कांदा तर 98 किलो हा मोठा कांदा होता. मात्र, गोल्टी कांदा हा बाजार समितीने मागणी नसल्याचे म्हणत खरेदी केला नाही. तर मोठा कांदा हा केवळ एक रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यात आला. त्यामुळे त्यांनी बाजार समितीत आणलेल्या एकूण कांद्याला केवळ 98 रुपये मिळाले तर गोल्टी कांदा तसाच बाजार समितीत त्यांना सोडून द्यावा लागला. या एकूण 443 किलो कांद्यासाठी गाडी भाडे आणि सर्व बाजार समिती तोलाई-वाराई खर्च मिळून 663 रुपये खर्च आला. त्यातून 98 रुपये कांद्याचे झालेले पैसे वजा जाता, शेतकरी वैभव शिंदे यांनाच खिशातून 565 रुपये देऊन गाडी भाडे आणि अन्य खर्चासाठी व्यापाऱ्याला द्यावे लागले आहे.

खिशातून दिले 565 रुपये (Onion Rate Farmer RS 565 from Pocket)

शेतकरी वैभव शिंदे या प्रकाराबाबत बोलताना म्हटले आहे की, आपली 7 एकर जमीन असून, आपण त्यातील दोन एकरमध्ये कांदा लागवड केली होती. त्यासाठी आपल्याला लावणीचा खर्च 70 हजार रुपये इतका आला असून, यावर्षी कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने कांदा लागवड केली. मात्र सोलापूर बाजार समितीत कांदा विक्रीला नेला असता. त्याला केवळ एक रुपया प्रति किलो दर मिळाला आहे. तर गोल्टी कांदा हा बाजार समितीकडून खरेदी देखील करण्यात आला नाही. त्यामुळे पदरी काहीच पडले नाही. उलट आडत दुकानदाराला खिशातून 565 रुपये द्यावे लागले आहे.

निर्यातबंदीने घात केला

शेतकरी वैभव शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी टोमॅटो लागवडीतून चांगला नफा मिळवला होता. त्यानंतर त्यांनी कांदा पिकावर लक्ष केंद्रित केले होते. आधीच्या कांद्याला त्यांना चांगला दरही मिळाला. मात्र उर्वरित कांदा निर्यात बंदीनंतर एक रुपया इतक्या बेभावाने विकला जात आहे. दुष्काळी परिस्थितीतही मोठ्या कष्टाने त्यांनी कांदा पीक उभे केले होते. चांगला दरही मिळत होता मात्र सरकारच्या एका निर्णयाने आपला कांदा बाजार समितीत टाकून, खिशातून पैसे आडत्याचे द्यावे लागत असल्याची भावना वैभव शिंदे यांनी बोलून दाखवली आहे.

error: Content is protected !!